मुंबई : महाराष्ट्रात सध्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सोयाबीन पिकाचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे स्पष्ट होत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. शेंगा वाळण्याआधीच कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात सोयाबीन उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता व्यक्त होत असून, याचा थेट परिणाम बाजारभावावर होणार आहे.
advertisement
महाराष्ट्रातील सोयाबीनचे सरासरी उत्पादन
दरवर्षी राज्यात सुमारे ४० ते ५० लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली जाते. सरासरी उत्पादन १० ते १२ क्विंटल प्रति हेक्टर (१००० – १२०० किलो) इतके आहे. चांगले हवामान, चांगली जात आणि वेळेवर पेरणी झाल्यास उत्पादन १५ क्विंटल प्रति हेक्टर पर्यंत पोहोचते. मात्र, दुष्काळ, अतिवृष्टी आणि कीडरोग यामुळे उत्पादन काही ठिकाणी ७–८ क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत खाली घसरते. महाराष्ट्राचे उत्पादन हे मध्य प्रदेश आणि राजस्थानपेक्षा कमी आहे.
पावसामुळे मोठा तडाखा
सध्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठी उत्पादन घट होऊ शकते. जमिनीत पाणी साचल्याने पिकांचा निचरा होत नाही आणि त्यामुळे शेंगा कुजतात. या नुकसानीमुळे राज्याचा उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे.
पुरवठा कमी होणार?
महाराष्ट्र हा देशातील सोयाबीन उत्पादनात अग्रेसर राज्य आहे. देशाच्या एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा सुमारे ३० टक्के वाटा आहे. महाराष्ट्रात नुकसान झाल्यास राष्ट्रीय बाजारातही पुरवठ्याची कमतरता निर्माण होईल. त्यामुळे सोयाबीनचे दर चढण्याची शक्यता आहे.
किंमतवाढ होणार का?
व्यापाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सध्या बाजारात सोयाबीनचे दर ४,५०० ते ५,००० प्रति क्विंटल रुपये आहेत. उत्पादन घटल्यास दरात ५०० ते ८०० प्रति क्विंटल वाढ होऊ शकते. त्यामुळे ज्यांच्या शेतात पिके टिकून आहेत, त्या शेतकऱ्यांना चांगला फायदा होण्याची शक्यता आहे.
तेल उद्योगावर मोठा परिणाम
सोयाबीनपासून सोयातेल आणि डीओसी (डे-ऑइल्ड केक) तयार केले जाते. उत्पादन घटल्याने तेल गिरण्यांना कच्चा माल कमी मिळेल. याचा थेट परिणाम स्वयंपाकाच्या तेलाच्या दरांवर होईल. सोयातेल महाग झाल्यास त्याचा परिणाम इतर तेलांच्या बाजारभावावरही दिसून येईल.
दरम्यान, पुरामुळे महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. सरासरी उत्पादन घटल्याने बाजारात सोयाबीनचे दर वाढतील हे निश्चित आहे. शेतकरी मात्र या संकटातून बाहेर कसे पडतात? यावरच त्यांचा पुढील हंगाम ठरणार आहे.