धक्कादायक! AI चा गैरवापर करत तरुणीचे अश्लील फोटो, पिंपरीत पहिला गुन्हा दाखल
- Published by:Prachi Amale
- Reported by:Govind Wakde
Last Updated:
Pimpri Crime : अज्ञात व्यक्तीने इंस्टाग्रामवर तिच्या नावाने बनावट अकाउंट तयार केले, त्यावरून सतत तिला मेसेज पाठवले जात होते.
पुणे: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा गैरवापर करून तरुणीच्या फोटोमध्ये अश्लील बदल करण्यात आल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवड शहरात उघड झाली आहे. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अशा प्रकारचा हा शहरातील पहिला गुन्हा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या संदर्भात 20 वर्षीय तरुणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तिच्या तक्रारीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने इंस्टाग्रामवर तिच्या नावाने बनावट अकाउंट तयार केले. त्यावरून सतत तिला मेसेज पाठवले जात होते. सुरुवातीला याकडे तरूणीने दुर्लक्ष केले परंतु सतत होत असलेल्या त्रासामुळे तिने आरोपीला पोलिसांत तक्रार देण्याचा इशारा दिला. यानंतर आरोपीने आणखी धक्कादायक पाऊल उचलले.
advertisement
AI चा वापर करत अश्लील फोटो
त्याने पीडित तरुणीचा इंस्टाग्रामवरील एक फोटो डाउनलोड करून AI तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तिच्या ड्रेसमध्ये बदल केले. त्यातून तयार झालेला अश्लील फोटो थेट तरुणीला पाठवला. इतकेच नव्हे, तर आरोपीने तिचे आणखी अशा प्रकारचे फोटो तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने तातडीने चिखली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
advertisement
अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी भारतीय दंड विधान (IPC) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्यानुसार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी सायबर क्राइम शाखेची मदत घेतली जात आहे.
सोशल मीडियावर जागरूक राहण्याचे आवाहन
सायबर गुन्ह्यांमध्ये AI चा गैरवापर करून अशा प्रकारे धमक्या देण्याचे हे एक नवीन आणि चिंताजनक स्वरूप आहे. वाढत्या तंत्रज्ञानामुळे अशा गुन्ह्यांमध्ये सातत्याने नवीन पद्धती वापरल्या जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर जागरूक राहून संशयास्पद हालचाली त्वरित पोलिसांना कळवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
हे ही वाचा :
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 23, 2025 4:43 PM IST