विदर्भ-मराठवाड्यासह महाराष्ट्रात पुढील ४८ तास मुसळधार पाऊस; मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणार
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, नवरात्रोत्सवावर पावसाचे सावट, शेतकऱ्यांचे नुकसान, सरकारकडे मदतीची मागणी, मान्सून परतीचा प्रवास लांबणीवर.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल झाले आहेत. येत्या 24 तासांत मराठवाड्यात, तर २४ ते २७ सप्टेंबरदरम्यान विदर्भात अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे यंदाचा नवरात्रोत्सव पाऊस गाजण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रावरील कमी दाबाचा पट्टा कमकुवत झाला असला, तरी पश्चिम बंगालच्या खाडीत नव्याने कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या दिशेने वाऱ्यांचा प्रवाह वाढला आहे. २५-२६ सप्टेंबर रोजी पुन्हा चक्रीवादळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, त्यामुळे हवामानात आणखी मोठे बदल अपेक्षित आहेत.
राज्यात पावसाचा जोर वाढणार
नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. गरब्यावर पावसाचं सावट असणार आहे. त्यामुळे या नवरात्रीतही पावसाचा मुक्कम राहणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४८ तास राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. यानंतर हळूहळू पावसाचा जोर कमी होईल. मात्र, विदर्भामध्ये २७-२८ सप्टेंबरपर्यंत पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
advertisement
पालघर, ठाणे आणि मुंबईत आज मुसळधार पाऊस राहील. तर पुढचे तीन दिवस हळूहळू पाऊस कमी होत जाईल. घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्र, तळ कोकणात पाऊस वाढण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये 48 तास वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
advertisement
सोलापूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्यं पाऊस झाला. त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं. गुडघाभर पाणी शेतात आणि घरांमध्ये शिरलं आहे. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि तातडीनं पंचनामे करुन मदत जाहीर करावी असं शेतकरी आवाहन करत आहेत. हळद, कांदा लावलेलं पिक अति मुसळधार पावसाने सडलं आणि त्यामुळे मोठं नुकसान झालं आहे.
advertisement
परतीचा मान्सून लांबणीवर
या वर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणीवर पडणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास ५ ते १० ऑक्टोबरदरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे अजून काही दिवस राज्यात पावसाचे वातावरण कायम राहील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 22, 2025 7:05 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
विदर्भ-मराठवाड्यासह महाराष्ट्रात पुढील ४८ तास मुसळधार पाऊस; मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणार