जालना : मराठवाड्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी सध्या आंबिया बहाराचे नियोजन करत आहेत. आंबिया बहाराचे नियोजन करत असताना भविष्यात होणारी फळगळ टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. आंबिया बहाराची मोसंबी पावसाळ्यात झाडावर तग धरून राहत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर फळगळ होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होते. मागील चार ते पाच वर्षांपासून ही समस्या प्रकर्षाने मराठवाड्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावत आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी शेतकऱ्यांनी आतापासूनच काय काळजी घ्यावी? याबाबत आम्ही बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉक्टर संजय पाटील यांच्याकडून माहिती जाणून घेतली पाहुयात.
advertisement
मोसंबी फळगळ टाळण्यासाठी काय करावे?
आंबिया बहाराचे नियोजन करत असताना शेतकऱ्यांनी सर्वात आधी झाडावर असलेल्या मृत फांद्या काढून घ्याव्यात. त्याचबरोबर मागील भागातील सडलेली कुजलेली फळे गोळा करून बांधाच्या बाजूला एक खड्डा करून त्यात करून टाकावीत. यामुळे झाडाच्या खाली असलेल्या बुरशीचे नियंत्रण करण्यास मदत होते. त्याचबरोबर झाडावर, झाडाच्या बुंध्यावर आणि जिथे जुन्या बहरतील फळे पडलेली आहे अशा जमिनीवर बोडो मिश्रणाची फवारणी करावी. यामुळे बुरशीजन्य रोगांपासून झाडाचे संरक्षण करण्यास मदत होते. त्याचबरोबर भविष्यातील मोसंबी फळगळ टाळण्यास देखील मदत होते.
रेशीम धाग्यातून श्रीमंतीचा मार्ग, शेतकऱ्यांचं नशीब पालटलं, आता मिळतो इतका भाव
बोडो मिश्रणाची फवारणी करण्याबरोबरच झाडाच्या बुंध्याला बोडो पेस्ट लावणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे डिंक आणि अन्य बुरशीजन्य रोगांपासून झाडाच्या बुंध्याचे संरक्षण होते. बोडो मिश्रण तयार करण्यासाठी एक किलो मोरचूद आणि एक किलो चुना दहा लिटर पाण्यात व्यवस्थित मिसळून त्याचे मिश्रण तयार करावे. हे मिश्रण झाडाच्या खोडावर लावल्यास मोसंबी झाडाचे बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होत असल्याची माहिती डॉक्टर संजय पाटील यांनी दिली.
झाडाच्या खोडाला बोडो पेस्ट लावत असताना ती योग्य पद्धतीने लावावी. बरेच शेतकरी त्यामध्ये गेरू टाकतात. तर काही शेतकरी त्यामध्ये चुना टाकतात. तर काही शेतकरी अन्य वेगळे पदार्थ टाकतात. हे शेतकऱ्यांनी टाळले पाहिजे. पावसाळा संपल्यावर आणि पावसाळा सुरू होण्याआधी शेतकऱ्यांनी झाडाच्या खोडाला बोडो पेस्ट लावावी, असे आवाहन पाटील यांनी केले.





