डोंगराळ माळरानावरून संशोधनाची सुरुवात
आष्टी तालुक्यातील दौला वडगाव येथील बाबासाहेब पिसोरे हे गेल्या सुमारे ३५ वर्षांपासून डोंगराळ आणि माळरानावरील शेती विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी शेतीला प्रयोगशीलतेची जोड दिली. जवळपास २५ वर्षांपासून ते कांदा बियाण्यांचे उत्पादन घेत असून, विविध कांदा वाणांवर सातत्याने संशोधन करत आहेत. कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे तसेच कांदा व लसूण संशोधन केंद्रांमधील अभ्यासाचा आधार घेत त्यांनी स्वतःच्या शेतावर प्रयोग सुरू ठेवले.
advertisement
‘शेतकरी केवळ उत्पादन घेणारा नाही’
“शेतकरी फक्त पीक घेणारा नसून तो संशोधनही करू शकतो,” असा ठाम विश्वास बाबासाहेब पिसोरे व्यक्त करतात. विविध कांदा वाणांचा अभ्यास, निवड पद्धती आणि प्रत्यक्ष शेतातील अनुभव यांच्या आधारे त्यांनी २००७ साली ‘सोना ४०’ हा वाण विकसित केला. त्यानंतर आजतागायत या वाणाचे सातत्याने उत्पादन घेत त्यांनी त्याच्या गुणधर्मांची खात्री करून घेतली.
‘सोना ४०’ कांदा वाणाची वैशिष्ट्ये
पिसोरे यांच्या मते, त्यांच्या २५ वर्षांच्या अनुभवातून विकसित झालेल्या ‘सोना ४०’ कांद्यामध्ये दोन ते तीन पातळ्या (पत्ती) असल्याने साठवणीत नुकसान कमी होते. या वाणाची टिकवणक्षमता अधिक असून रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे. खरीप, रब्बी तसेच लेट खरीप (हिवाळी-उन्हाळी) अशा तिन्ही हंगामात हा कांदा घेता येतो.
एका कांद्याचे सरासरी वजन १०० ते १२५ ग्रॅमपर्यंत असते. पेरणी, रोपे लागवड तसेच मल्चिंग पद्धतीने लागवड शक्य आहे. साध्या लागवडीत एकरी सुमारे २५ टन उत्पादन मिळते, तर मल्चिंग केल्यास हे उत्पादन ३५ टनांपर्यंत जाते. कांद्याचा रंग आकर्षक व एकसारखा असल्याने हा वाण निर्यातीसाठीही उपयुक्त ठरतो. डेंगळा, गोल्टी, चिंगळी यांसारख्या विकृती या कांद्यात दिसून येत नाहीत.
केंद्र सरकारची मान्यता आणि कायदेशीर हक्क
‘सोना ४०’ या वाणाच्या उत्पादकता आणि गुणवत्तेमुळे अहिल्यानगर, बीडसह राज्यभरातील शेतकऱ्यांकडून या बियाण्याला मोठी मागणी वाढली. या वाणाला अधिकृत मान्यता व हक्क मिळावेत यासाठी बाबासाहेब पिसोरे यांनी चार वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या वाण नोंदणी विभागाकडे अर्ज केला होता. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या शेताला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. अखेर ५ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘सोना ४०’ या वाणाला मान्यता प्रमाणपत्र देण्यात आले.
शेतकऱ्यांसाठी नवा मार्ग
या मान्यतेमुळे बाबासाहेब पिसोरे यांना ‘सोना ४०’ वाणाच्या उत्पादन आणि विक्रीसाठी कायदेशीर हक्क व संरक्षण मिळाले आहे. हे हक्क ५ डिसेंबर २०२५ पासून सहा वर्षांसाठी लागू असून, पुढील नुतनीकरणानंतर आणखी नऊ वर्षे वाढवता येणार आहेत. शेतकऱ्याच्या संशोधनाला मिळालेली ही मान्यता इतर शेतकऱ्यांनाही संशोधनाकडे वळण्यासाठी निश्चितच प्रेरणा देणारी ठरणार आहे.
