वाफळे गावात राहणारे शेतकरी देविदास मच्छिंद्र चव्हाण यांनी एका एकरात साधा भगवा या जातीच्या डाळिंबाची लागवड केली आहे. साधा भगवा डाळिंबाची लागवड करण्याआधी देविदास यांनी शेतामध्ये चारी मारून 14 बाय 8 वर डाळिंबाच्या रोपांची लागवड एका एकरात केली आहे. त्यानंतर बेड मारून शेणखत, भेसळ डोस भरून घेतले. पहिल्या वर्षी डाळिंबाची लागवड केल्यावर देविदास चव्हाण यांना सर्व खर्च वजा करून 50 ते 60 हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळाले होते.
advertisement
दुसऱ्या वर्षी बागेचे व्यवस्थापन व्यवस्थित झाले असून एका झाडाला कमीत कमी 15 ते 20 फळे लागलेली आहेत. तर एका झाडातून 20 ते 25 किलो डाळिंब मिळणार आहे. डाळिंबाची लागवड करण्यासाठी एका एकराला दीड ते दोन लाख रुपये खर्च आला आहे, तर सर्व खर्च वजा करून शेतकरी देविदास चव्हाण यांना सहा लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळणार आहे.
डाळिंबाच्या रोपांवर तेल्या, करपा, कुजवा आणि डाग या रोगांचा प्रादुर्भाव जास्त असतो. हा रोग डाळिंबावर येऊ नये म्हणून चव्हाण यांनी वेळोवेळी फवारणी करून रोगांपासून डाळिंबाचे संरक्षण केले आहे. व्यापारी देविदास यांच्या शेतामध्ये येऊन डाळिंबाची पाहणी करून खरेदी करतात किंवा सोलापूर, पुणे, मुंबई, या ठिकाणी विक्रीसाठी पाठवत आहेत. मुंबईतील एका व्यापाऱ्याने देविदास चव्हाण यांची डाळिंबाची बाग पाहिली असून 105 रुपये किलो दराने मागणी केली आहे. डाळिंब पिकाची लागवड केल्यावर त्याची काळजी वेळोवेळी घेतली तर डाळिंबातून सुद्धा अधिक उत्पन्न आपल्याला मिळू शकते, असा सल्ला शेतकरी देविदास चव्हाण यांनी दिला आहे.





