जालना : राज्यातील शेतकरी मोठ्या संख्येने रेशीम शेतीकडे वळत आहेत. सहज उपलब्ध झालेली बाजारपेठ आणि रेशीम कोषांना मिळत असलेला चांगला दर यामुळे या शेतीकडे शेतकरी उत्पन्नाचा चांगला मार्ग म्हणून पाहत आहेत. मराठवाड्यातील दुष्काळी पट्ट्यात ही रेशीम शेती मोठ्या प्रमाणावर होत आहे. रेशीम शेती करत असताना तुतीच्या झाडांचा पाला रेशीम किड्यांना द्यावा लागतो. हे करत असताना शेतकऱ्यांना मोठे शारीरिक श्रम करावे लागतात. हे श्रम कमी करण्यासाठी जालना जिल्ह्यातील शेतकरी गणेश दाते यांनी अनोखा देशी जुगाड केला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे शारीरिक श्रम कमी होत असून वेळेची बचत होत आहे.
advertisement
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील शिंदे वडगाव येथे दाते कुटुंब राहते. गणेश दाते आणि त्यांचे बंधू यांनी मिळून एक एकर तुती लागवडीपासून रेशीम शेती चार एकर तुती लागवडी पर्यंत वाढवली आहे. दर महिन्याला त्यांना सरासरी एक लाख रुपयांचे उत्पन्न रेशीम शेती मधून मिळतं.
रक्ताच्या लोकांनी वाऱ्यावर सोडलं, आज त्याच हातांनी कमावले 5 लाख, लढवय्या लोकांची गोष्ट!
रेशीम शेतीच्या जोरावरच त्यांनी शेतामध्ये 20 ते 25 लाख रुपये किंमतीचा बंगला देखील बांधला आहे. मात्र या शेतीमध्ये काटेकोर नियोजन आणि रेशीम किड्यांना योग्य प्रमाणात तुतीचा पाला द्यावा लागतो. हा पाला कमी पडल्यास उत्पन्नात घट होते. पाला देत असताना शेवटच्या स्टेजमधील आठ दिवस अतिशय महत्त्वाचे असतात. या दिवसात रेशीम किडे मोठ्या प्रमाणावर पाला फस्त करतात. या दिवसात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर शारीरिक कष्ट घ्यावे लागतात.
शेतामधून विळ्याच्या सहाय्याने तुतीचा पाला कापून तो रॅकमध्ये ठेवावा लागतो. हे करताना प्रत्येक वेळी खाली वाकून पाला घेणे आणि उभं राहून रॅकमध्ये ठेवणे कष्टदायक असते. हे टाळण्यासाठी दाते यांनी घरातील वापरात असलेल्या बाजेला प्लास्टिकची चार चाकी बसवली आहेत. यामुळे त्यांचे शारीरिक श्रम आणि वेळेची बचत होत आहे. गावातीलच वेल्डिंग कारागिराकडून अशी बाज तयार करण्यास त्यांना दोन ते अडीच हजारांचा खर्च आल्याचे गणेश दाते यांनी सांगितलं.





