केंद्र सरकारच्या किमान आधारभूत किंमत (MSP) खरेदी योजनेअंतर्गत राज्यात भरडधान्य खरेदी करण्याच्या सूचना मिळाल्या होत्या. त्यानुसार, २०२४-२५ या हंगामात ज्वारीचे अतिरिक्त उत्पादन झाल्याने सरकारने मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे. आता त्या ज्वारीचा प्रभावी वापर होण्यासाठी ती रेशन दुकानांतून मोफत वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
अन्न व नागरी पुरवठा विभागाने प्रत्येक जिल्ह्यातील पुरवठा अधिकाऱ्यांना या वाटपासाठी आवश्यक तयारी सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्येक पात्र कुटुंबाला दोन महिन्यांच्या कालावधीत प्रत्येकी एक किलो ज्वारी मोफत दिली जाणार आहे. ही योजना ‘अंत्योदय अन्न योजना’ आणि ‘प्राधान्य कुटुंब योजना’ या दोन्ही योजनांतील लाभार्थ्यांसाठी लागू असेल.
या निर्णयामुळे राज्यातील गरीब आणि वंचित घटकांना सणासुदीच्या काळात मोठा दिलासा मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने जिल्हानिहाय ज्वारीचे वाटप आणि उचल प्रक्रिया निश्चित केली आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण ज्वारीचे वितरण पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
राज्यातील पुणे शहर, पुणे जिल्हा, सातारा, सांगली, नांदेड, परभणी, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, लातूर, सोलापूर शहर आणि सोलापूर जिल्हा या बारा जिल्ह्यांसाठी एकूण २२ हजार ७६६ टन ज्वारी लागणार आहे. याशिवाय हिंगोली, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांसाठी सुमारे ४ हजार १३ टन ज्वारी लागेल.
राज्यातील अनेक भागांत शेतकऱ्यांना अतिवृष्टी, दुष्काळ आणि भावकपातीचा फटका बसला होता. अशा पार्श्वभूमीवर सरकारचा हा निर्णय शेतकरी तसेच गरजू नागरिकांसाठी लाभदायक ठरणार आहे. ज्वारी हा पौष्टिक आणि आरोग्यदायी धान्य म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या उपक्रमामुळे नागरिकांच्या अन्नसुरक्षेसोबतच ज्वारी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही अप्रत्यक्ष फायदा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.