25 एकर क्षेत्रात अत्याधुनिक सुविधा
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथे 25 एकर क्षेत्रात हा प्रकल्प साकारला आहे. यात 10,000 मेट्रिक टन क्षमतेचे सायलो, 10,000 मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम, स्वतंत्र ग्रेडिंग आणि स्वच्छता यार्ड, मोठ्या वाहनांसाठी ट्रक टर्मिनल आणि पेट्रोल पंप, तसेच शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी सामाजिक सुविधा केंद्र यांचा समावेश आहे. या सर्व सुविधा शेतमाल साठवणूक आणि वितरण प्रक्रियेत क्रांतिकारी बदल घडवून आणतील.
advertisement
समृद्धी महामार्गाचा थेट लाभ
या पार्कचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचे समृद्धी महामार्गालगतचे स्थान. या महामार्गाच्या माध्यमातून शेतकरी आणि व्यापारी आपला माल थेट मुंबईतील जेएनपीटी बंदरात पोहोचवू शकतील, जेथे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी मालाची निर्यात सुलभ होईल. यामुळे शेतमालाला चांगला दर मिळण्यास मदत होईलच, शिवाय स्थानिक रोजगारालाही चालना मिळेल.
इतर तीन लॉजिस्टिक पार्क रखडलेले
राज्य सरकारने समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूंना एकूण चार अॅग्रो लॉजिस्टिक पार्क उभारण्याचे नियोजन केले आहे. जांबरगावचा प्रकल्प पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात असताना, उर्वरित तीन प्रकल्प कागदावरच अडकले आहेत. नागपूर विभागातील वर्धा येथे ‘कॉटन लॉजिस्टिक पार्क’ साठी जागा ताब्यात आली आहे, तर वाशिम जिल्ह्यात जागा निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, निधीअभावी ही कामे रखडलेली असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
उद्घाटनाची प्रतिक्षा
जांबरगाव लॉजिस्टिक पार्कचे काम जवळपास पूर्ण झाले असून, केवळ विद्युत जोडणीची प्रक्रिया शिल्लक आहे. काही आठवड्यांतच हा प्रकल्प औपचारिकपणे कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. यानंतर मराठवाडा आणि आसपासच्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी अधिक चांगल्या बाजारपेठा, सुविधा आणि दारे खुली होतील. हा प्रकल्प राज्यातील शेती क्षेत्रात आधुनिकतेची नवी दिशा दाखवणारा ठरेल, असा विश्वास शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
