प्रयोगशाळेसाठी अर्ज मागवले
शेतातील जमिनीतील पोषणद्रव्यांची तपासणी, कोणतं पीक घ्यावे, किती खत द्यावे याचा अचूक अंदाज घेण्यासाठी मातीची तपासणी केली जाते, त्यालाच मृदा परीक्षण म्हणातात. जिल्ह्यात राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ग्रामस्तरीय मृद नमुना तपासणी प्रयोगशाळा उभारण्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. स्थानिक पातळीवर माती परीक्षण सुविधा उपलब्ध करून शेतकऱ्यांना जलद सेवा देण्याचा शासनाचा उद्देश आहे.
advertisement
सध्या ठाणे जिल्ह्यात एकच शासकीय माती परीक्षण प्रयोगशाळा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होते. यावर उपाय म्हणून माती परीक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिलं जाणार आहे. या अनुदानाचा वापर करून शेतकऱ्यांना गावातच माती परीक्षणासाठी प्रयोगशाळा काढता येणार आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा कृषी अधीक्षक रामेश्वर पाचे यांनी दिली.
कोणाला मिळू शकतो लाभ?
मृदा परीक्षण प्रयोगशाळा उभारण्यासाठी इच्छुक शेतकरी, शेतकरी गट, स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, कृषी उद्योजक अर्ज करू शकतात. स्थानिक शेतकरी गट आणि माती परीक्षणाबाबत अनुभव असलेल्या संस्थांना शासनाकडून जास्त प्राधान्य दिलं जाणार आहे. प्रयोगशाळा उभारण्यासाठी जागा आणि तांत्रिक कौशल्य गरजेचं आहे.
अर्जदारांसाठी पात्रता
अर्जदार ठाणे जिल्ह्याचा रहिवासी असावा. त्याने किमान दहावी उत्तीर्ण केलेली असावी किंवा माती परीक्षणाचं प्रशिक्षण घेतलेलं असावं. प्रयोगशाळेसाठी जागा आणि मूलभूत सुविधा उपलब्ध असल्या पाहिजेत. याशिवाय, अर्जदाराकडे कौशल्य, आर्थिक स्थिरता असणं गरजेचं आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी कृषी कार्यालय किंवा महाडीबीटी पोर्टलवर संपर्क साधावा, असं आवाहन जिल्हा कृषी विभागाने केलं आहे. याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल, असंही कृषी विभागाकडू सांगण्यात आलं.
दीड लाख अनुदान
प्रत्येक प्रयोगशाळा उभारणीसाठी सरकारकडून दीड लाख रुपयांचं अनुदान दिलं जाईल. अनुदानाचा वापर प्रयोगशाळेची उभारणी, उपकरणांची खरेदी आणि तांत्रिक सुविधांसाठी करायचा आहे. जर पात्र अर्जदारांची संख्या जास्त असेल तर पारदर्शक सोडत पद्धतीने निवड केली जाईल. योग्य आणि पात्र व्यक्ती, संस्थांना संधी दिली जाईल.
