जालना - मराठवाड्यातील सोयाबीन आणि कापूस ही प्रमुख नगदी पिके आहेत. मात्र, या दोन्ही शेतमालांना हमीभावापेक्षा कमी दर खाजगी बाजारात मिळत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. केंद्र सरकारने कापसाला 7521 रुपये एवढा हमीभाव जाहीर केला आहे. राज्यात अनेक ठिकाणी सीसीआय मार्फत कापूस खरेदी सुरू झाली आहे. खासगी बाजारात 7 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर कापसाला मिळत आहे. तर सीसीआयमार्फत गुणवत्तेनुसार 7200 ते 7521 रुपये दर कापसाला मिळत आहे. खासगी बाजारापेक्षा सीसीआयकडे कापसाला अधिकचा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सीसीआय कडेच कापसाची विक्री करणे फायद्याचे ठरणार आहे.
advertisement
सीसीआयकडे कापूस विक्री करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी लोकल18 च्या टीमने जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहाय्यक सचिव अनिल खंडागळे यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली.
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, 15 नोव्हेंबर 2024 रोजी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सीसीआय मार्फत शासकीय हमीभावानुसार कापसाची खरेदी सुरू झाली आहे. बाजार समितीचे मुख्य प्रशासक अर्जुन खोतकर आणि सचिव मोहन राठोड यांच्या उपस्थितीत खरेदीला प्रारंभ करण्यात आला आहे. आतापर्यंत 30 हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. तर तब्बल 104 शेतकऱ्यांनी सीसीआय मार्फत कापसाची विक्री केली आहे.
मोबाईलचा अतिवापर फारच धोकादायक, आतातरी लक्षात घ्या, अन्यथा होईल मोठं नुकसान, VIDEO
निवडणुकीच्या धामधुमीमुळे सीसीआय मार्फत मंद गतीने कापूस खरेदी सुरू होती. आता मात्र मोठ्या संख्येने कापूस खरेदी करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सीसीआय कडे कापसाची विक्री करावी, असे आवाहन बाजार समितीचे सहाय्यक सचिव अनिल खंडागळे यांनी केले आहे.
कोणकोणती कागदपत्रे सोबत आणावीत -
सीसीआय मार्फत कापूस विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या सातबारे पीक पाहणीद्वारे कापसाची नोंद केलेली अत्यावश्यक असणार आहे. त्याचबरोबर बँक खात्याशी संलग्न असलेले आधार कार्ड सोबत आणणे गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर विक्रीसाठी आणत असलेला कापूस हा स्वच्छ आणि कचरा विरहित असावा. त्याचबरोबर त्याची आर्द्रता ही आठ ते बारा टक्क्यांच्या दरम्यान असावी. प्रति एकर 12 क्विंटल पर्यंत कापसाची खरेदी सीसीआय मार्फत केली जात असल्याचे बाजार समितीचे सहाय्यक सचिव अनिल अंबानी खंडागळे यांनी सांगितले.