अल्पभूधारक शेतकरी म्हणजे कोण?
ज्या शेतकऱ्यांकडे ५ एकरांपेक्षा कमी शेती जमीन आहे, त्यांना अल्पभूधारक शेतकरी म्हणून ओळखले जाते. अशा शेतकऱ्यांना शासनाकडून विविध सवलती, अनुदान योजना, कर्जसवलत, पीक विमा आणि आर्थिक मदतीचा लाभ दिला जातो. त्यामुळे हे प्रमाणपत्र केवळ कागदपत्र नसून शेतकऱ्यांसाठी अनेक संधींची किल्ली ठरते.
अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र कुठे मिळते?
advertisement
अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र शेतकरी तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रामार्फत मिळवू शकतात. याशिवाय महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या ‘आपले सरकार’ या ऑनलाइन पोर्टलवरूनही हे प्रमाणपत्र सहजपणे मिळवता येते. शेतकऱ्यांना जो पर्याय सोयीचा वाटेल, त्या पद्धतीने अर्ज करता येतो. ऑनलाइन अर्जासाठी https://aaplesarkar.mahaonline.gov.in
या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागते.
आवश्यक कागदपत्रांची यादी
प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतात. ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा शासनाने दिलेले इतर ओळखपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्र आवश्यक असते.
पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड, वीज बिल, पाणी बिल, घरफाळा पावती, सातबारा किंवा ८-अ उतारा सादर करता येतो.
जमीन आणि महसूल संदर्भातील कागदपत्रे
अल्पभूधारक शेतकरी असल्याचे सिद्ध करण्यासाठी जमिनीचा सातबारा उतारा किंवा ८-अ उतारा अनिवार्य आहे. तसेच संबंधित तलाठ्यांचा अहवालही आवश्यक असतो. याशिवाय शेतकऱ्याने स्वतः भरलेले स्वयंस्वीकृती (स्वयंघोषणा) पत्र अर्जासोबत जोडावे लागते. हे स्वंयघोषणापत्र सर्व अर्जदारांसाठी बंधनकारक आहे.
आपले सरकार पोर्टलवर अर्ज कसा कराल?
आपले सरकार पोर्टलवर प्रथम नवीन वापरकर्ता नोंदणी करावी लागते. त्यासाठी नाव, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडीची नोंद करून लॉगिन तयार करावे. लॉगिन केल्यानंतर डॅशबोर्डवर महसूल विभाग निवडावा. त्यानंतर महसूल सेवा या पर्यायातून ‘अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र’ ही सेवा निवडावी.
अर्ज भरताना घ्यायची काळजी
अर्ज करताना वैयक्तिक माहिती, पत्ता आणि किती वर्षांपासून त्या पत्त्यावर वास्तव आहे, याची माहिती अचूक भरावी लागते. आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतात. ही कागदपत्रे साधारणपणे ७५ केबी ते ५०० केबीच्या आकारमानात असावीत. फोटो आणि सही देखील अपलोड करणे आवश्यक आहे. सर्व माहिती भरल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्क भरावे लागते आणि मिळणारी पावती जतन करून ठेवावी.
१५ दिवसांत मिळते प्रमाणपत्र
ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज सादर केल्यानंतर साधारणपणे १५ दिवसांच्या आत अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र मिळते. जर काही कारणाने या कालावधीत प्रमाणपत्र मिळाले नाही, तर १५ दिवसांनंतर आपले सरकार पोर्टलवर लॉगिन करून अपील अर्ज सादर करता येतो. योग्य कागदपत्रांसह अर्ज केल्यास शेतकऱ्यांना हे प्रमाणपत्र सहजपणे प्राप्त होते.
