मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने काही दिवसांपूर्वी ई-पीक पाहणीबाबत महत्त्वाची घोषणा केली . अनेक शेतकरी विविध कारणांमुळे ई-पीक पाहणी ॲपवर आपल्या पिकांची नोंदणी करू शकले नव्हते. 15 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे. मग आता नोंदणी कुठे आणि कशी करायची? याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत..
advertisement
ई-पीक पाहणी ही शेतातील प्रत्यक्ष पिकांची नोंद शासनाकडे उपलब्ध करून देणारी प्रणाली आहे. याच माहितीच्या आधारे शासन विविध योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवते. मात्र, अनेक ग्रामीण भागांमध्ये इंटरनेट सुविधा मर्यादित असल्याने किंवा स्मार्टफोन उपलब्ध नसल्याने अनेक शेतकरी ऑनलाईन नोंदणीपासून दूर राहिले होते. याची दखल घेत शासनाने ऑफलाईन पर्याय खुला करून दिला आहे.
कुठे कराल नोंदणी?
ऑफलाईन ई-पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या गावातील तलाठी कार्यालयात किंवा संबंधित कृषी सहाय्यकांशी संपर्क साधावा लागणार आहे. तलाठी किंवा कृषी सहाय्यक शेतकऱ्यांकडून आवश्यक माहिती घेऊन ती नोंदवतील. यामध्ये पिकाचे नाव, लागवडीची तारीख, क्षेत्रफळ, पिकाचा प्रकार यासारखी अचूक माहिती देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी ही माहिती योग्य व सत्य स्वरूपात दिल्यास भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही.
या प्रक्रियेद्वारे शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी ऑफलाईन पद्धतीने पूर्ण केली जाईल आणि ती माहिती शासनाच्या प्रणालीमध्ये नोंदवली जाईल. त्यामुळे संबंधित शेतकरी पीक विमा योजना, नुकसानभरपाई, अनुदान तसेच इतर कृषी योजनांसाठी पात्र ठरतील. प्रशासनाकडूनही तलाठी आणि कृषी अधिकाऱ्यांना या कामासाठी विशेष सूचना देण्यात आल्या असून, शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शासनाच्या या निर्णयामुळे शेती क्षेत्रात पारदर्शकता वाढण्यास मदत होणार असून, खऱ्या अर्थाने पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-पीक पाहणी केलेली नाही, त्यांनी 15 जानेवारीपूर्वी तलाठी कार्यालयात संपर्क साधून आपली नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
