जालन्यातील पिंपरखेडा गरड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जालना जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी बाळासाहेब खरात आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांच्या संकल्पनेतून तसेच मुख्याध्यापक विजय कुमार खरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा डिजिटल डिटॉक्स आणि अभ्यास अभियान सुरू झाले आहे. आजचे तरुण हे देशाचे भविष्य असल्याने ते शैक्षणिकदृष्ट्या सुदृढ बनावे या उद्देशाने वाटूर आणि परिसरातील सर्व धार्मिक स्थळांना यात सहभागी करून घेण्यात आले आहे.
advertisement
या उपक्रमांतर्गत रोज सायंकाळी सात वाजता गावातील मंदिर, मस्जिद, समाज मंदिर, गुरुद्वारा आणि विहारावरील स्पीकरवरून अभ्यासाची वेळ झाल्याची घोषणा (अनाउन्समेंट) केली जाईल. यावेळी पालकांना घरातील मनोरंजनाची साधने बंद करून मुलांना अभ्यासाला बसवणे बंधनकारक असणार आहे.
या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी नियोजित बैठकीला वाटूर पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार खंदारे, वाटूरचे सरपंच कमलताई केशर खाने, माजी उपसरपंच अझहर भाई शेख यांनी या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला आहे. 19 डिसेंबर 2025 पासून या उपक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली असून जालन्यातील इतर गावांनीही हा आदर्श घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अभ्यासाचे वेळापत्रक आणि नियम
सायंकाळी सात वाजता भोंग्यावरून सूचना मिळताच टीव्ही आणि मोबाईल बंद करणे.
सायंकाळी सात ते दहा ही वेळ सलग अभ्यासासाठी राखीव.
पहाटे पाच ते सात या वेळेतही मोबाईल वापरास बंदी आणि अभ्यास सत्र.





