मुंबई : कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या नावावर असलेली जमीन, शेती किंवा मालमत्ता वारसांच्या नावावर करण्यासाठी ठराविक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते. अनेकदा माहितीच्या अभावामुळे किंवा चुकीच्या सल्ल्यामुळे वारसांना अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे मृत व्यक्तीच्या नावावरील जमीन आपल्या नावावर कशी करायची, याबाबतची संपूर्ण आणि सोपी प्रक्रिया जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. या प्रक्रियेला ‘वारस नोंदणी’ किंवा ‘फेरफार करून नाव लावणे’ असे म्हटले जाते.
advertisement
प्रक्रिया काय?
सर्वप्रथम मृत्यू दाखला मिळवणे आवश्यक आहे. संबंधित व्यक्तीचा अधिकृत मृत्यू दाखला नगरपालिका, नगरपरिषद किंवा ग्रामपंचायत कार्यालयातून घ्यावा लागतो. हा दाखला नोंदणीकृत आणि वैध असणे अत्यावश्यक आहे. मृत्यू दाखल्याशिवाय पुढील कोणतीही महसूल प्रक्रिया पूर्ण होत नाही.
यानंतर वारस दाखला मिळवणे हा महत्त्वाचा टप्पा असतो. वारस दाखला मिळवण्यासाठी दोन मार्ग उपलब्ध आहेत. जर वारसांमध्ये वाद, जास्त संख्या किंवा गुंतागुंतीचा प्रश्न असेल, तर न्यायालयीन प्रक्रिया करावी लागते. यामध्ये स्थानिक सिव्हिल कोर्टात वारस हक्क प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा लागतो. वकिलामार्फत अर्ज दाखल करून न्यायालयीन सुनावणी व आदेशानंतर वारस दाखला मिळतो. ही प्रक्रिया तुलनेने वेळखाऊ असते.
दुसरा मार्ग काय?
दुसरा मार्ग म्हणजे तहसील किंवा तालुका कार्यालयामार्फत वारस दाखला मिळवणे. जर प्रकरण सोपे असेल आणि वारसांमध्ये कोणताही वाद नसेल, तर हा मार्ग अधिक सोयीस्कर ठरतो. यासाठी तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावा लागतो. गाव पातळीवर चौकशी, पंचनामा आणि साक्षीदारांच्या जबाबानंतर महसूल विभाग अहवाल तयार करतो आणि त्यानंतर वारस दाखला दिला जातो.
मृत्यू दाखला आणि वारस दाखला मिळाल्यानंतर फेरफार नोंदणीसाठी अर्ज करावा लागतो. हा अर्ज तलाठी कार्यालयात सादर करावा लागतो. अर्जासोबत मृत्यू प्रमाणपत्र, वारस दाखला, सातबारा उताऱ्याची प्रत, आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्रे जोडावी लागतात. जर सर्व वारसांची सहमती असेल, तर त्यांचे संमतीपत्रही अर्जासोबत जोडणे फायदेशीर ठरते.
सातबारा उतारा तपासा
अर्ज सादर झाल्यानंतर तलाठी फेरफार नोंद घेतात आणि त्याला एक विशिष्ट फेरफार क्रमांक दिला जातो. ही नोंद ई-सातबारा प्रणालीवरही दिसू लागते. फेरफार मंजूर झाल्यानंतर सातबारा उताऱ्यावर नवीन वारसांचे नाव नोंदवले जाते. नागरिक आपला सातबारा उतारा mahabhulekh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पाहू शकतात.
या प्रक्रियेत सर्व वारसांची नावे नमूद करणे अत्यंत आवश्यक असते. एखाद्या व्यक्तीने एकट्याने अर्ज करून इतर वारसांना बाजूला ठेवल्यास, त्या फेरफारावर आक्षेप येण्याची शक्यता असते. त्यामुळे भविष्यातील वाद टाळण्यासाठी सर्व वारसांची सहमती घेणे महत्त्वाचे आहे.
फेरफार मंजूर झाल्यानंतर ई-सातबारावर नाव दिसण्यासाठी साधारणपणे पंधरा दिवसांपासून एका महिन्यापर्यंतचा कालावधी लागू शकतो. सर्वसामान्य महसूल प्रक्रियेसाठी फारसा खर्च येत नाही, मात्र न्यायालयीन प्रक्रियेत शुल्क थोडेफार जास्त असू शकते. अधिक अचूक माहितीसाठी नागरिकांनी जवळच्या तलाठी किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
