गुरुजी विनोद कुलकर्णी यांनी सांगितले की, संक्रांतीच्या दिवशी काही दान केले तर ते आपल्याला 100 पटीने परत मिळते. त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातील संकटे दूर होण्यास मदत होते. देवांची कृपादृष्टी होते. त्यामुळे संक्रांती दिवशी दान करण्याला खूप महत्त्व आहे. संक्रांतीच्या शुभ काळामध्ये आपल्या ऐपतीप्रमाणे तुम्ही गोष्टीचे दान करू शकता. मात्र, दान करताना मन शुद्ध ठेवावे आणि कोणताही अहंकार न बाळगता आपल्या ऐपतीप्रमाणे दान करावे. अशा दानामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि जीवनात सुख-समृद्धी येते.
advertisement
कोणत्या गोष्टीचे दान करावे?
मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी तीळ, वस्त्र, गाय, सोने-चांदी, तांदूळ, विविध डाळी तसेच सप्तधान्याचे दान केले जाते. सप्तधान्य म्हणजे सात प्रकारची धान्ये एकत्र करून केलेले दान. यामध्ये जव, गहू, तीळ, मूग, तांदूळ, हरभरा आणि ज्वारी किंवा बाजरी यांचा समावेश असतो. मन शुद्ध ठेवून, कोणताही दिखावा न करता प्रत्येकाने आपल्या ऐपतीप्रमाणे दान करावे. संक्रांतीच्या दिवशी सप्तधान्याचे दान केल्यास नवग्रह शांत होतात आणि आयुष्यात स्थिरता व सकारात्मकता येते, अशी धार्मिक मान्यता आहे.
संक्रांती दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्यात?
संक्रांतीच्या पर्वकाळात दात घासणे, कठोर किंवा वादग्रस्त बोलणे, गवत तोडणे, गाई-म्हशींची धार काढणे तसेच मांसाहार, दारू, लसूण-कांदा किंवा जड अन्न सेवन टाळावे, असे गुरुजी विनोद कुलकर्णी यांनी सांगितले आहे. या दिवशी मन शांत ठेवणे, संयम राखणे आणि सकारात्मक विचार करण्यावर भर द्यावा तसेच संक्रांतीच्या शुभ काळात दान, उपास, पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि धार्मिक कार्य केल्यास जीवनात स्थिरता, आरोग्य व समृद्धी प्राप्त होते, असेही त्यांनी सांगितले आहे.





