ग्रामपंचायतींच्या कामकाजात पारदर्शकता
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून थेट निधी ग्रामपंचायतींना मिळतो. मात्र या निधीचा वापर नेमका कुठे होतो, कोणती कामं सुरू आहेत, किती खर्च झाला आहे, याची माहिती साधारणपणे ग्रामस्थांना मिळत नाही. त्यामुळे अनेकदा शंका आणि तक्रारी निर्माण होतात. ‘मेरी पंचायत’ अॅप हीच पोकळी भरून काढणार असून ग्रामपंचायतींचे सर्व व्यवहार आता ग्रामस्थांसमोर पारदर्शकपणे मांडले जाणार आहेत.
advertisement
अॅपमधून मिळणारी माहिती
या अॅपवर ग्रामस्थांना खालीलप्रमाणे महत्त्वाची माहिती मिळेल. जसे की,
आपल्या गावातील ग्रामपंचायत सदस्यांची संपूर्ण यादी, स्थापन झालेल्या विविध समित्या व त्यांचे अध्यक्ष, ग्रामपंचायतीने दिलेल्या नवीन सूचना व नोटीसेस, गावाला मिळालेलं सरकारी अनुदान व त्याचा वापर, कोणत्या योजनेतून कोणती विकासकामं सुरू आहेत याची माहिती, ग्रामपंचायतीची बँक खाती आणि खर्चाचे तपशील, पाण्याचे स्रोत, नळजोडण्या आणि सुविधा यांची नोंद, प्रत्येक कामासाठी झालेला खर्च आणि शिल्लक निधीचा हिशोब
ग्रामस्थांचा अभिप्रायही महत्त्वाचा
या अॅपची खासियत म्हणजे ग्रामस्थांना फोटो अपलोड करून अभिप्राय नोंदवण्याची सुविधा आहे. एखादं काम निकृष्ट दर्जाचं असेल किंवा चांगलं काम झालं असेल, तर त्याचा फोटो टाकून सूचना किंवा तक्रार करता येते. त्यामुळे स्थानिक पातळीवर जबाबदारीची भावना वाढेल आणि चांगल्या प्रशासनाला चालना मिळेल.
आर्थिक लेखाजोखा मोबाईलवर
‘मेरी पंचायत’ अॅपचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ग्रामपंचायतीचा आर्थिक हिशोब आता सर्वांसाठी खुला झाला आहे. कोणत्या कामासाठी किती रक्कम मंजूर झाली, प्रत्यक्षात किती खर्च झाला आणि अजून किती शिल्लक आहे, हे सर्व तपशील ग्रामस्थांना मोबाईलवर पाहता येतील. त्यामुळे अनावश्यक गैरसमज दूर होऊन भ्रष्टाचारालाही आळा बसेल.