वाशिम : शासनाच्या योजनांबाबत साधी विचारणा करणेही शेतकऱ्यांसाठी धोक्याचे ठरत आहे का? असा प्रश्न उपस्थित करणारी धक्कादायक घटना मंगरुळपीर तालुक्यात समोर आली आहे. मनरेगा योजनेंतर्गत संत्रा फळबागेचे रखडलेले अनुदान विचारल्याने एका शेतकऱ्याला तालुका कृषी अधिकाऱ्याकडून बुटाने आणि मातीच्या ढेकळाने मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला असून, या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकारामुळे शेतकरी वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
advertisement
नेमकं काय घडलं?
गोगरी परिसरातील शेतकरी ऋषिकेश पवार यांनी दोन वर्षांपूर्वी मनरेगा योजनेंतर्गत तीन एकर क्षेत्रावर संत्रा फळबाग लागवड केली होती. शासनाकडून या फळबागेसाठी मिळणारे अनुदान चार महिन्यांपासून थकित असल्याचा त्यांचा दावा आहे. वारंवार पाठपुरावा करूनही अनुदान न मिळाल्याने पवार हे चिंतेत होते. दरम्यान, तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे हे गोगरी शिवारात पाहणीसाठी आले असता, पवार यांनी त्यांच्याकडे थकित अनुदानाबाबत विचारणा केली.
बुटाने मारहाण केली
या विचारणीतूनच वादाला तोंड फुटल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. आरोपानुसार, अनुदानाबाबत प्रश्न विचारताच तालुका कृषी अधिकारी अचानक आक्रमक झाले. त्यांनी शेतकऱ्याच्या अंगावर धाव घेत बुटाने मारहाण केली. इतकेच नव्हे, तर जमिनीवर पडलेली मातीची ढेकळे उचलून ती शेतकऱ्यावर फेकल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ काही नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रीत केला असून, तो सध्या सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे.
कठोर कारवाईची मागणी
व्हायरल व्हिडीओमध्ये शेतकऱ्याला बुटाने मारहाण होत असल्याचे दृश्य स्पष्टपणे दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. या व्हिडीओमुळे प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली असून, शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
तुला गुन्ह्यात अडकवतो
या घटनेनंतर संबंधित अधिकाऱ्याने शेतकऱ्याला धमकी दिल्याचाही गंभीर आरोप पुढे आला आहे. “तुला गुन्ह्यात अडकवतो,” अशी धमकी देण्यात आल्याचे ऋषिकेश पवार यांनी सांगितले आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती परिसरात पसरताच विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि स्थानिक शेतकरी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.
माझ्यावरील आरोप पूर्णपणे खोटे
दरम्यान, या प्रकरणावर तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी आपली बाजू मांडली आहे. “एक व्यक्ती महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर धावत होती. ती व्यक्ती संबंधित शेतकरी नव्हती. परिस्थिती शांत करण्याचा मी प्रयत्न केला. मी अंगावर धावलो असलो, तरी कोणतीही मारहाण केलेली नाही. माझ्यावरील आरोप पूर्णपणे खोटे आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी संघटनांनी केली आहे. व्हायरल व्हिडीओमुळे हा प्रकार अधिक गंभीर ठरत असून, प्रशासन आता या प्रकरणावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
