जालना : केवळ अनुभवाच्या बळावर उद्योग व्यवसायात चांगली प्रगती करणारे आपल्या आजूबाजूला अनेक असतील. मात्र विशिष्ट अशा व्यवसायाचे शिक्षण घेऊन पुढे त्याच व्यवसायात करिअर करणारे तुरळक असतात. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील एका तरुणाने डेअरी टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेऊन डेअरी व्यवसायात स्वतःच नशीब आजमावले. सध्या हा तरुण वर्षाकाठी 50 ते 60 लाखांची उलाढाल डेअरी व्यवसायाच्या माध्यमातून करत असून वेगवेगळे प्रॉडक्ट विकून तो नफा कमवत आहे. जालना शहरात सुरू असलेल्या गोदा समृद्धी कृषी प्रदर्शनात त्याने आपला स्टॉल लावला आहे.
advertisement
गणेश अंधारे असं या उद्यमशील तरुणाचं नाव आहे. जाफराबाद तालुक्यातील एका छोट्याशा गावातील या तरुणाचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण देऊळगाव राजा येथे झालं. तर उच्च शिक्षण घेण्यासाठी त्याने गाव सोडून शहर गाठलं. डेअरी व्यवसायात आवड असल्याने डेअरी टेक्नॉलॉजीचे शिक्षण त्याने पूर्ण केलं. त्यानंतर अमोल पार्स यासारख्या नामांकित कंपनीमध्ये त्याने कर्मचारी म्हणून काम देखील केलं.
यानंतर मात्र स्वतःच अस्तित्व उभ करण्यासाठी गावातच स्वतःचा वेगवेगळे पदार्थ निर्मितीचा प्लांट सुरू केला. सध्या त्याच्या या प्लांटवर तब्बल दहा हजार लिटर दूध प्रतिदिन संकलित होत आहे. या दुधापासून लस्सी, दही, तूप, खवा, पेढा, बासुंदी अशा पद्धतीचे पदार्थ तयार करून त्याची बाजारात विक्री करण्याचं काम गणेश अंधारे करत आहे. स्वतःच्या ब्रँडला त्याने गोपेश्वर असं नाव दिलं आहे.
डेअरी व्यवसायात आवड असल्याने डेअरी टेक्नॉलॉजीचे शिक्षण पूर्ण केलं. यानंतर विविध नामांकित कंपन्यांमध्ये काम केलं. कामाचा अनुभव आल्यानंतर स्वतःच काहीतरी अस्तित्व असावं म्हणून व्यवसाय उभारणी केली. सध्या दररोज दहा हजार लिटरपर्यंत दूध संकलित होत असून दुधावर प्रक्रिया करून वेगवेगळे पदार्थ निर्मिती करण्यात येत आहे. या माध्यमातून वर्षाकाठी 50 ते 60 लाखांची उलाढाल होत असल्याचं गणेश अंधारे यांनी सांगितलं.