महाशिवरात्रीसाठी लोगणावचे शेतकरी हजारो क्विंटल रताळ्याचे उत्पन्न घेतात. प्रत्येक शेतकऱ्याकडे 10 गुंठ्यांपासून ते 4-5 एकर पर्यंत देखील रताळ्याची लागवड केलेली असते. कोट्यावधी रुपयांची उलाढाल रताळी पिकाच्या शेतीमधून लोणगाव गावातील शेतकरी करतात.
advertisement
लोणगाव या गावाला रताळ्याचं गाव म्हणून ओळख कशी मिळाली? हे लोकल 18 च्या प्रतिनिधीने गावातील पोलीस पाटील राजेश टाकळकर यांच्याकडून जाणून घेतलं.
मागील 15 वर्षांपासून डोणगाव गावातील शेतकरी रताळी पिकाची शेती करतात. फेब्रुवारी महिन्यामध्ये रताळ्याची काढणी झाल्यानंतर त्याच्याच काडीपासून रोपे तयार केली जातात आणि फेब्रुवारी ते जून पर्यंत या रोपांची जपणूक केली जाते. पाऊस पडल्यानंतर जुलै महिन्यामध्ये या रोपांची दीड बाय दोन या अंतरावर लागवड केली जाते.
लागवड करतानाच रासायनिक खत, शेणखत कीड लागू नये म्हणून थायमेट शेतामध्ये टाकले जाते. पावसाळ्यामध्ये तीन ते चार पाळ्या टाकल्या जातात. मोठी होईपर्यंत तण नियंत्रण केलं जातं. पावसाळ्यातील चार महिने पाणी देण्याची आवश्यकता नसते. ऑक्टोबर ते जानेवारी पर्यंत या पिकाला भरपूर पाणी दिलं जातं.
फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये महाशिवरात्रीच्या पंधरा दिवस आधीपासूनच लोणगावमध्ये रताळ्याची काढणी करण्याची लगबग सुरू असते. बळीराम नांगराच्या साह्याने शेताची नांगरणी केली जाते आणि शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतमजूर या रताळ्याची वेचणी करतात. बांधावर येऊनच रताळ्याच्या क्वालिटीनुसार व्यापारी 10 ते 15 रुपये प्रति किलो या दराने रताळ्याची खरेदी करतात.
एक एकर क्षेत्रावर 200 ते 300 क्विंटल रताळ्याचे उत्पन्न होतं. यातून उत्पादन आणि भावानुसार 2 ते 3 लाखांचं हमखास उत्पन्न मिळतं. पुणे, नाशिक, नागपूर, वाशिम, जळगाव, इंदोर अशा राज्यातील आणि बाहेर राज्यातील शहरांमधूनही व्यापारी रताळी खरेदी करण्यासाठी या गावांमध्ये येत असतात. वार्षिक 8 ते 10 कोटींची उलाढाल दरवर्षी होते, असं गावचे पोलीस पाटील राजेश टाकळकर यांनी सांगितलं. (नारायण काळे, प्रतिनिधी )