कौटुंबिक व्यवसाय सोडण्याचा धाडसी निर्णय
संतोष जाधव हे शिक्षणात १२ वीपर्यंतच शिकले आहेत. त्यांचे कुटुंब उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सोने-चांदीचा व्यापार करत होते. त्यामुळे संतोषही काही वर्षे या व्यवसायात सहभागी होते. मात्र त्यांना शेतीची ओढ असल्याने त्यांनी हा व्यवसाय सोडून गावी परतण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या कुटुंबासाठी धक्कादायक होता. अनेक नातेवाईकांनी आणि मित्रांनी त्यांना हा निर्णय बदलण्याचा सल्ला दिला, पण संतोष यांनी शेतीत काहीतरी वेगळे करण्याचा निर्धार सोडला नाही.
advertisement
यशस्वी शेतकऱ्यांकडून घेतले धडे
२०१२ ते २०१६ या कालावधीत संतोष यांनी महाराष्ट्रात बाइकवरून मोठा दौरा केला. या प्रवासात त्यांनी अनेक यशस्वी शेतकऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या कामकाजाची माहिती घेतली. या अनुभवातून त्यांना जाणवले की अनेक शेतकरी अजूनही जुन्या पद्धतीने शेती करत आहेत आणि त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबाबत योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्या काळात इंटरनेटवर शेतीविषयक व्यावहारिक माहितीही फारशी उपलब्ध नव्हती.
यूट्यूबवरून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
याच पार्श्वभूमीवर संतोष यांनी आपल्या बालमित्र आकाश जाधव याच्यासोबत २०१८ मध्ये Indian Farmer नावाचे यूट्यूब चॅनेल सुरू केले. आकाश हा मॅकेनिकल इंजिनिअर असून त्याने तांत्रिक बाबींमध्ये मदत केली. या चॅनेलद्वारे शेतकऱ्यांना सोप्या भाषेत आधुनिक शेती तंत्रज्ञान, पिक व्यवस्थापन, बाजारपेठ आणि सेंद्रिय शेतीबाबत माहिती देण्याचा त्यांचा उद्देश होता. काही वर्षांतच या चॅनेलला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि आज त्याचे १ कोटी १० लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
संतोष जाधव यांनी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनक्षमता वाढवली. ते ड्रोनच्या मदतीने केवळ १० मिनिटांत एक एकर जमिनीवर फवारणी करतात. पूर्वी याच कामासाठी मजुरांना पाच तासांहून अधिक वेळ लागत होता. संतोष सकाळी शेतात काम करतात, दुपारी व्हिडिओ शूट करतात आणि रात्री त्याचे संपादन करून दुसऱ्या दिवशी यूट्यूबवर पोस्ट करतात. त्यामुळे त्यांची शेती आणि डिजिटल प्लॅटफॉर्म दोन्ही एकत्र चालतात.
११ एकर जमिनीवर विविध पिके
संतोष सध्या वडिलोपार्जित ११ एकर जमिनीवर शेती करत आहेत. त्यांनी अर्धा एकर क्षेत्रात पॉलिहाऊस उभारले आहे. तसेच वर्षभर उत्पादन मिळावे यासाठी जमिनीचे नियोजन केले आहे. सुमारे तीन एकर क्षेत्रात ऊस, दीड एकर क्षेत्रात निर्यातीसाठी द्राक्षे, दोन एकर क्षेत्रात हंगामी टोमॅटो, एक एकर क्षेत्रात शिमला मिरची आणि एक एकर क्षेत्रात काकडीची लागवड केली आहे. उर्वरित काही जमीन आलटून-पालटून पिकांसाठी वापरली जाते.
शेतीसोबत डिजिटल उत्पन्न
आज त्यांच्या यूट्यूब चॅनेलमधून दरमहा जवळपास दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. याशिवाय दर महिन्याला सुमारे ६० हजार नवीन सबस्क्राइबर्स वाढत आहेत. गुगल अॅडसेन्स जाहिराती आणि इन्फ्लुएंसर मार्केटिंग या दोन माध्यमांतून ते कमाई करतात. काही अॅग्रीटेक कंपन्यांच्या उत्पादनांचे प्रमोशन करूनही त्यांना उत्पन्न मिळते.
