दुर्मीळ तंत्रज्ञानाची अनोखी ओळख
‘लांझ बुलडॉग एचएल-१२’ हा १२ हॉर्सपॉवर क्षमतेचा सिंगल सिलिंडर ‘हॉट बल्ब इंजिन’वर चालणारा ट्रॅक्टर आहे. या इंजिनला सुरू करण्यापूर्वी गरम करावे लागते, ही त्याची वैशिष्ट्यपूर्ण पद्धत. कमी वेगातही तो प्रभावीपणे काम करतो. शेती नांगरणे, पाणी पंप चालवणे, गिरण्या फिरवणे अशी विविध कामे हा ट्रॅक्टर सहज करत असे. १९२१ ते १९५० या कालावधीत तयार झालेल्या या मालिकेतील ट्रॅक्टर आज अत्यंत दुर्मीळ समजले जातात. जर्मन शेती तंत्रज्ञानाच्या सुरुवातीच्या प्रगतीचे ते प्रतीक मानले जाते.
advertisement
मुळात हा ट्रॅक्टर ब्रिटिश मालकीचा होता. स्वातंत्र्यपूर्व काळात तो पंजाबमध्ये आला आणि एका स्थानिक शेतकऱ्याच्या ताब्यात गेला. काळाच्या ओघात त्याची उपेक्षा झाली आणि तो विस्मृतीत गेला.
भंगार समजून दुर्लक्षित केलं
जालंधरमधील शहीद भगत सिंह चौक परिसरातील एका जुन्या इमारतीत हा ट्रॅक्टर दशकानुदशके गंजलेल्या अवस्थेत पडून होता. स्थानिकांसाठी तो केवळ एक जुनी, निरुपयोगी वस्तू होती. मुले त्यावर खेळत, काहीजण त्याला भंगार समजत. ट्रॅक्टरचा मूळ मालक सुमारे ४० वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थायिक झाला होता. त्यामुळे त्याची खरी किंमत ओळखणारा कोणी उरला नव्हता.
परंतु विंटेज वाहनांचे शौकीन आणि संग्राहकांसाठी मात्र हा एक अमूल्य ठेवा ठरू शकत होता.
सोशल मीडियामुळे बदलले नशीब
सुमारे अडीच महिन्यांपूर्वी एका इन्स्टाग्राम प्रभावकाने या ट्रॅक्टरचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडिओ काही दिवसांतच व्हायरल झाला आणि देश-विदेशातील संग्राहकांचे लक्ष वेधले गेले. स्थानिक नगरसेवक पुनीत वढेरा यांनीही या संदर्भात व्हिडिओ प्रसिद्ध केला.
प्रारंभी मुंबईतील एका कंपनीने २ लाख आणि नंतर २८ लाख रुपयांची ऑफर दिली; मात्र मालकाने ती नाकारली. अखेर १७ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिकेतील खरेदीदाराशी व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा होऊन १.२५ कोटी रुपयांत व्यवहार निश्चित झाला.
नव्या प्रवासाची सुरुवात
१८ फेब्रुवारीला क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्टर ट्रकमध्ये चढवून मुंबई बंदरावर आणण्यात आला. तेथून जहाजाद्वारे तो कॅलिफोर्नियाला रवाना झाला आहे. तेथे एका नामांकित कृषी संग्रहालयात तो मुख्य आकर्षण ठरणार आहे.
