जालना : उपवास कोणताही असो रताळी आवश्य खाल्ली जातात. महाशिवरात्री, एकादशी किंवा अन्य उपवासाला देखील रताळ्यांना मोठी मागणी असते. जालना जिल्ह्यातील एका गावाची ओळख तर रताळ्यांचा गाव म्हणून केली जाते. भोकरदन तालुक्यातील लोणगाव हे ते गाव. या गावांमध्ये महाशिवरात्री आधी तब्बल कोट्यावधी रुपयांची उलाढाल दरवर्षी होते. रताळ्याच्या शेतीवर गावचं अर्थकारण चालतं. यंदा मात्र परिस्थिती उलट झालीये. रताळ्यांना मिळत असलेला अत्यल्प दर आणि शेतामधून मिळालेलं कमी उत्पन्न यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. लोणगावातील एका रताळी उत्पादक शेतकऱ्यांशी लोकल 18 ने थेट संवाद साधला पाहुयात.
advertisement
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील लोणगाव हे गाव मागील अनेक वर्षांपासून रताळी शेतीसाठी प्रसिद्ध आहे. गावातील प्रत्येक शेतकऱ्याकडे किमान 10 गुंठे तर काही 4 एकर पर्यंत रताळी शेती केली जाते. या शेतीमधून एकरी 100 क्विंटल रताळी उत्पादन मिळतं. रताळीला 1500 ते 2000 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतो. यामुळे शेतकऱ्यांना एकरी दीड ते दोन लाखांचं उत्पन्न सहज मिळतं. यंदा मात्र लोणगावातील शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसलाय.
30 किलो वजन, 1 फुटाची शिंगे, कोल्हापुरात आला साडेचार लाखांचा सुलतान बोकड!
शेतीमधून एकरी 60 ते 70 क्विंटल एवढंच उत्पादन मिळालं. त्याचबरोबर रताळीला भाव देखील 1000 ते 1200 रुपये प्रति क्विंटल असाच मिळाला. त्यामुळे एकरी 60 ते 70 हजारांचंच उत्पन्न हातात आलं. यामध्ये एकरी 20 ते 25 हजारांचा मशागत खर्च आणि 10 ते 15 हजारांचा काढणी खर्च वजा गेला तर शेतकऱ्यांच्या हातामध्ये केवळ 20 ते 25 हजार रुपये राहिले. जास्त पावसामुळे रताळ्यांचं पोषण नीट झालं नाही. त्यामुळे आकार लहान राहिला यामुळेच भाव कमी मिळाल्याचे शेतकरी टाकळकर यांनी सांगितलं.
मी 30 गुंठे क्षेत्रावर रताळ्याची लागवड केली होती. जून महिन्यामध्ये लागवड केल्यानंतर या पिकावर 25 हजार रुपये खर्च केला. त्याला पाणी भरपूर प्रमाणात द्यावे लागते. त्याचीही तजवीज केली. रताळी काढण्यासाठी 15 हजार रुपयांच्या आसपास मजुरी खर्च झाला. परंतु अपेक्षित उत्पन्न मिळालं नाही. त्यामुळे माझ्याबरोबरच गावातील सर्व शेतकरी हवालदिल आहेत. कमी मिळालेले उत्पादन आणि दर देखील कमी मिळाल्यामुळे दुहेरी फटका आम्हाला सहन करावा लागल्याचं शेतकरी लक्ष्मण सावंत यांनी सांगितलं.