राज्यात यंदा झालेल्या विक्राळ पावसामुळे खरिपाच्या तब्बल १ कोटी ४६ लाख हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे ६८.७२ लाख हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये पावसाने हाहाकार माजवला, मात्र सर्वाधिक तडाखा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला बसला. शेतकऱ्यांची उभी पिके वाहून गेली, घरसंसार उद्ध्वस्त झाला आणि पशुधनही पाण्याच्या प्रवाहात नष्ट झाले.
advertisement
महापुराचे परिणाम
या आपत्तीमुळे सुमारे ४७ टक्के खरिप क्षेत्र बाधित झाले असून खरिप हंगाम जवळपास संपुष्टात आला आहे. धाराशीव, जालना, बीड, लातूर, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर शेती उद्ध्वस्त झाल्याने भाजीपाला, धान्य आणि अन्नधान्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. त्यातच गाई-म्हशींचा मृत्यू, चाराही वाहून जाणे यामुळे दुधाच्या उत्पादनावरही फटका बसणार आहे. त्यामुळे पुढील काळात अन्नधान्याबरोबरच दुधाच्या किमतीतही भरमसाठ वाढ होण्याची चिन्हे आहेत.
शेतकऱ्यांची स्थिती अधिक बिकट
या पुरामुळे ८६ शेतकऱ्यांचा बळी गेल्याची वृत्तपत्रांमध्ये नोंद आहे, जरी सरकारकडून अद्याप अधिकृत आकडेवारी जाहीर झालेली नाही. शेतकऱ्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक पाठराखण कोसळली आहे. अनेक कुटुंबांना रोजीरोटीचा प्रश्न भेडसावतो आहे. मुलांचे शालेय साहित्य वाहून गेले किंवा पाण्यात भिजल्याने वापरण्यायोग्य राहिले नाही. शाळांची इमारत, वर्गातील साहित्य आणि अंगणवाड्यांचे साधनसामग्रीही नष्ट झाली आहेत. परिणामी शेतकऱ्यांसमोर जगण्याचा प्रश्न तर आहेच, पण मुलांच्या शिक्षणाचाही मोठा पेच निर्माण झाला आहे.