अटी शिथिल करून दिलासा
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत महत्त्वाची घोषणा केली. मदत मिळवण्यासाठी आवश्यक असलेली ई-केवायसीची अट शिथिल करण्यात आली असून आता शेतकऱ्यांच्या अॅग्रीस्टॅक नोंदणीला मदतीचा आधार मानले जाणार आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना प्रक्रियात्मक अडथळे न येता थेट मदत मिळू शकेल. "पुढील दोन ते तीन दिवसांत सर्व माहिती स्पष्ट होईल आणि पुढील आठवड्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करण्यात येईल," असे त्यांनी सांगितले.
advertisement
दिवाळीपूर्वी खात्यावर मदत
राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे. दिवाळीपूर्वीच ही मदत शेतकऱ्यांच्या हाती पोहोचेल, ज्यामुळे सणासुदीच्या काळात त्यांना दिलासा मिळणार आहे. "शेतकऱ्यांना यासाठी वेगळ्या प्रक्रियेत धावपळ करावी लागणार नाही, मदत थेट खात्यावर जमा होईल," असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
"ओला दुष्काळ" संकल्पनेवर सरकारचा निर्णय
पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी "ओला दुष्काळ" या विषयावरही भूमिका मांडली. ते म्हणाले, "मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ अशी कोणतीही संकल्पना अस्तित्वात नाही आणि आजवर कधीही त्याची घोषणा झालेली नाही. मात्र शेतकऱ्यांच्या सातत्याने होत असलेल्या मागणीचा विचार करून सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे."
दुष्काळातील सवलती आता अतिवृष्टीसाठीही लागू
मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, दुष्काळ जाहीर झाल्यावर ज्या सवलती शेतकऱ्यांना दिल्या जातात, त्या आता अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठीही लागू होणार आहेत. यामुळे अतिवृष्टीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना थेट दिलासा मिळणार आहे.
शेतकऱ्यांसाठी मोठा आधार
सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या सणासुदीला थोडासा आर्थिक हातभार लागणार असून, त्यांच्या अडचणी काही प्रमाणात कमी होतील. नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेऊन शासनाने दिलेल्या हमीप्रमाणे मदतीची रक्कम तातडीने खात्यावर जमा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.