पुणे : खरीप संपून नुकताच रब्बी हंगाम सुरु झाला आहे. गहू, बार्ली, मोहरी, हरभरा, मसूर, तीळ, ओट ही हंगामातील प्रमुख पिके आहेत. यंदाच्या वर्षी मान्सून पाऊस लांबला. अगदी दिवाळीतही परतीच्या मान्सूनने हजेरी लावली. त्याचा शेतीवरही परिणाम झाला. आता या पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार का? याबाबत पुणे येथील पुणे येथील हवामान शास्त्रज्ञ जालिंदर साबळे यांनी माहिती दिलीये.
advertisement
महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सूनचा पाऊस जून ते सप्टेंबर राहिला. या काळात सरासरीच्या जवळपास 121 टक्के पाऊस झाला. सप्टेंबर महिन्याचा विचार केला तर 125 टक्के पाऊस या महिन्यात झाला. त्याचप्रमाणे दिवाळीपर्यंत परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्याचा शेतीला चांगला फायदा झाला. राज्यातील परतीच्या पावसाला 5 ऑक्टोबरला सुरुवात होते. नंदुरबार, धुळे भागातून सुरु होऊन 12 ते 13 ऑक्टोबरला तो संपूर्ण महाराष्ट्रातून जातो. परंतु यंदाच्या वर्षी हा पाऊस 10 दिवस लांबला आहे.
शेती अवजारे गंजण्याचा धोका, मशागत केल्यावर कशी घ्यावी काळजी?
नोव्हेंबरमध्ये थंडीची तीव्रता कमी
यंदा कोकण आणि विदर्भात नोव्हेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमान राहणार आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात कमाल तापमान हे सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नोव्हेंबर मध्ये जी थंडी जाणवते ती या वर्षी जाणवणार नाही. तर यंदा कडाक्याची थंडी ही डिसेंबर मध्ये जाणवण्यास सुरुवात होईल, असेही साबळे यांनी सांगितले.
रब्बी हंगामात घेतली जाणारी पीके
रब्बी हंगामात कोकण विभागात हरभरा, वाल, कुळीथ, चवळी घेतली जाते. तर मध्य महाराष्ट्रात रब्बी ज्वारी, हरभरा, करडई, मक्का, गहू, कांदा आणि द्राक्ष घेतलं जातं. तसेच मराठवाड्यात देखील रब्बी ज्वारी, हरभरा, जवस, करडई, मक्का ही पिके घेतली जातात. विदर्भात रब्बी ज्वारी, हरभरा, करडई, जवस, गहू आदी पिके रब्बी हंगामात घेतली जातात. मान्सूनचा परतीचा पाऊस सुरू झाला की पिकांच्या पेरणीला सुरुवात केली जाते.
फक्त 5 फुटावर होता बिबट्या, रेडकाचा जीव कसा वाचवला, शेतकऱ्यानं सांगितली आपबिती
रब्बी पिके पेरणी कालावधी
रब्बी ज्वारी : 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर
करडई : 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर
हरभरा : जिरायती 15 सप्टेंबर नंतर,
हरभरा : बागायती 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर
मक्का 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर
सूर्यफूल : ऑक्टोबर पहिला पंधरवडा ते नोव्हेंबर पहिला पंधरवडा
गहू : जिरायती 1 ते 10 नोव्हेंबर,
गहू : बागायती 1 नोव्हेंबर ते डिसेंबर पहिला पंधरवडा.
रब्बी हंगाम (2024-25)
राज्यात रब्बी पिकांचे सरासरी क्षेत्र 53.97 लाख हेक्टर आहे. 6.21 लाख हेक्टर क्षेत्रावर (11%) पेरणी पूर्ण झाली आहे. राज्यात रब्बी हंगामाच्या पूर्व मशागतीची कामे तसेच पेरणी सुरू आहे. रब्बी ज्वारी व जिरायत करडईची पेरणी जवळपास पूर्ण झालेली असून हरभरा, मक्का, गहू, सूर्यफूल, जवस, वाल, चवर्की, हुलगे, बटाटा, वाटाणा इ पिकांची पेरणी सुरू आहे.
राज्यातील रब्बी हंगाम बघितला तर पाऊस लांबल्यामुळे पेरणीला सुरुवात झाली नाही. कोकणातील रब्बीचे क्षेत्र हे 0 टक्के असून 2 टक्के पेरण्या झाल्या आहेत. तर पुणे विभागात 34 टक्के पेरण्या झाल्या आहेत. कोल्हापूर मध्ये 29 टक्के तर एकूण राज्यामध्ये रब्बीच्या पिकांच्या 11 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. राज्यामध्ये यंदा रब्बीला अनुकूल वातावरण असून लांबलेला पाऊस पिकांसाठी फायदेशीर ठरत आहे, अशी माहिती हवामान शास्त्रज्ञ साबळे यांनी दिली आहे.