याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मोसंबी फळावर सध्या बुरशीजन्य 'मगरी रोग' पडल्याने मोसंबीला गळती लागली आहे. त्यामुळे पैठण येथील पाचोड मोसंबी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आवक वाढली. आवक वाढल्यामुळे आणि मोसंबीची मागणी असलेल्या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने मोसंबीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आठवड्याभरात मोसंबीचे दर 20 हजारांहून 10 हजारांवर आल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
advertisement
पैठण तालुक्यातील पाचोड येथील मोसंबी मार्केट फार प्रसिद्ध आहे. सध्या पाचोड येथील मोसंबी मार्केटमध्ये दररोज तीनशेहून अधिक टन मोसंबी विक्रीसाठी येत आहे. येथील मोसंबीला दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, जयपूर, कानपूर, हैद्राबाद, कर्नाटक, कलकत्ता, मुंबई, पुणेसह परदेशात देखील मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे येथील मोसंबी खरेदी करण्यासाठी परराज्यातील व्यापारी ठाण मांडून असतात.
Mosambi Market: मोसंबी उत्पादकांना दुहेरी दिलासा, आडत असोसिएशनच्या निर्णयाने खिशात खेळणार पैसा
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडसह इतर जिल्ह्यातील शेतकरी आपला माल याच मार्केटमध्ये आणण्याला प्राधान्य देतात. सध्या मोसंबीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले आहे. त्यामुळे बाग विक्रीची मागणी वाढली आहे. याचाच फायदा व्यापारी घेत आहेत. बाग खरेदी करताना व्यापारी अतिशय कमी दर देत आहेत.
मोसंबीला चांगली मागणी असल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी 15 ते 19 हजार रुपये टन या भावाने मोसंबी खरेदी केली होती. मात्र, दिल्लीसह इतर ठिकाणी मोसंबीची मागणी घटल्याने तीच मोसंबी 10 हजार ते 12 हजार रुपये टन या दराने पुढे पाठवावी लागत आहे. त्यामुळे व्यापारी वर्गही संकटात सापडला आहे, असे पाचोडमधील मोसंबी व्यापारी अश्पाक शेख यांनी सांगितलं.
या वर्षी मोसंबीला कवडीमोल भाव मिळत आहे. अशातच मगरी रोगाने मोसंबीवर आक्रमण फळांची मोठ्या प्रमाणात गळ होऊ लागली आहे. परिणामी मोसंबी विक्रीसाठी बाजारपेठेत घेऊन जावी लागते. पण, सध्या मागणी घटल्याने अतिशय कमी दरात फळांची विक्री करावी लागत आहे, अशी प्रतिक्रिया मोसंबी उत्पादक शेतकऱ्याने दिली.