उत्तर भारतामध्ये होत असलेला मुसळधार पाऊस मोसंबीच्या दरातील घसरणीमागे मुख्य कारण आहे. त्याचबरोबर जालना जिल्ह्यात पावसाची उघडीप असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मोसंबीची तोड केली. यामुळे बाजारात आवक प्रचंड प्रमाणात वाढली. 400 ते 500 टनापर्यंत मोसंबीची आवक झाल्याने उत्तर भारतात पाऊस सुरू असल्याने मागणी आणि पुरवठा यातील गणित बिघडले आणि मोसंबीच्या दरामध्ये सहा ते सात हजार रुपये प्रति टन एवढी घसरण पाहायला मिळाल्याचं व्यापारी नाथा पाटील घनगाव यांनी सांगितलं.
advertisement
Agriculture: शेतकऱ्यांवर नवं संकट; टोमॅटो, वांगी अन् कांदा शेतीला रोगांचा धोका, अशी घ्या काळजी
या वातावरणीय बदलाचा परिणाम व्यापाऱ्यावरही झाल्याचे पाहायला मिळते. 20 ते 21 रुपये किलोने खरेदी केलेली मोसंबी 16 ते 17 रुपये प्रति किलोने विक्री करावी लागली. गाडीमागे प्रत्येकी 50 हजार ते 1 लाख रुपयांचा तोटा झाल्याचं देखील व्यापारी घनगाव यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितलं.
मोसंबीपेक्षा भंगार जास्त भावाने विकत आहे. अंत्यविधी करण्यासाठी देखील दोन झाडे तोडली तर तीन हजार रुपये येतात. मोसंबी दरातील घसरण ही आश्चर्यकारक आहे. एवढ्या कमी दरामध्ये मोसंबीची विक्री करणे शेतकऱ्याला अजिबात परवडत नाही. इतर भाजीपाला पिकांना भरपूर दर मिळतो परंतु मोसंबी ही आरोग्यासाठी चांगली असूनही तिला दहा ते पंधरा रुपये दर मिळत असल्याने बागेवर कुऱ्हाड चालवावी की काय? असा उद्विग्न सवाल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी शांतीलाल तुकाराम गायकवाड यांनी उपस्थित केला.