जालना : उत्तर भारतात होत असलेल्या हिमवृष्टीमुळे जालना शहरातील मोसंबी बाजारावर संक्रांत ओढवल्याचे चित्र आहे. बाजार समितीमध्ये मोसंबी घेऊन येण्याचे भाडे देखील निघत नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये मोसंबी फेकून दिली आहे. तर व्यापारी वर्गालाही कमी गुणवत्तेची मोसंबी उत्तर भारतात पाठवणे परवडत नसल्याने ती बाजार समितीतच फेकण्याची वेळ आली आहे. ही सर्व गंभीर परिस्थिती लक्षात घेता मोसंबी आडत्या असोसिएशनने 30 डिसेंबर ते 5 जानेवारी यादरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मोसंबी बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच आठवडाभर मार्केट बंद ठेवण्याची वेळ जालना शहरातील व्यापाऱ्यांवर आली आहे.
advertisement
मोसंबी या पिकासाठी डिसेंबर आणि जानेवारी हे महिने असेही फार दर देणारे नसतात. उत्तर भारतातील उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये हिमवृष्टी होत असते. याचाच परिणाम उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान या राज्यांमध्ये प्रचंड प्रमाणात थंडी वाढण्यास सुरुवात होते. थंडीच्या दिवसांमध्ये लोक पाणी पिण्याचे प्रमाणही कमी करतात. त्यात मोसंबी ज्यूस घेणं जवळपास टाळलं जातं.
यामुळे या दोन महिन्यांमध्ये मोसंबीचे दर ही दबावातच असतात. मात्र यावर्षी असंख्य शेतकरी आंबिया बहाराची मशागत करत असताना गळून पडलेली मोसंबी, त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना मोसंबी बाग काढायची असल्याने तसेच काही शेतकऱ्यांची आर्थिक अडचण असल्याने मिळेल ते भावात विक्री करण्याकडे कल असल्याचे पाहायला मिळत आहे.
बाजारात आल्यानंतर मोसंबीला केवळ 3 रुपये प्रति किलो पासून 12 रुपये प्रति किलो पर्यंत दर मिळत आहे. या भावामध्ये अनेक शेतकऱ्यांना मोसंबी बाजार समितीत आणण्याचा खर्च देखील निघत नसल्याचे पाहायला मिळत आहे. तर दोन-तीन नंबरची मोसंबी, खराब मोसंबी व्यापाऱ्यांनाही बाहेर राज्यात पाठवणं गाडी भाड्यापेक्षा महागात पडत आहे. शेतकरी आणि व्यापारी या दोन्हींची अडचण लक्षात घेऊन मोसंबी आडत्या असोसिएशनने 30 डिसेंबर ते 5 जानेवारी मोसंबीचा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी बाजारात मोसंबी विक्रीस आणू नये, आपली गैरसोय टाळावी आणि व्यापारी बांधवांना सहकार्य करावे, असे आवाहन मोसंबी आडत्या असोसिएशनचे अध्यक्ष नाथा पाटील घनघाव यांनी केले आहे.





