शेतकऱ्यांच्या खात्यात १८,६४० कोटींचे थेट हस्तांतरण
या कार्यक्रमा दरम्यान सुमारे ९ कोटी ३२ लाख पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे १८ हजार ६४० कोटी रुपये जमा केले जाणार आहेत.
मंत्री चौहान यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना ४ लाख ९ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आर्थिक मदत देण्यात आली आहे. आजचा हप्ता जमा झाल्यानंतर ही एकूण रक्कम ४ लाख २७ हजार कोटी रुपयांच्या पुढे जाणार आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळण्यास मदत होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
advertisement
कृषी उत्पादनात विक्रमी वाढ
गेल्या दशकात कृषी क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाल्याचेही चौहान यांनी सांगितले. २०१४ साली देशातील एकूण कृषी उत्पादन सुमारे २५२ दशलक्ष टन होते, ते २०२५ मध्ये वाढून ३५७ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचले आहे.
फलोत्पादन क्षेत्रातही मोठी वाढ झाली असून उत्पादन २७७ दशलक्ष टनांवरून ३६९ दशलक्ष टनांपर्यंत वाढले आहे. फळे आणि भाजीपाला उत्पादनात सातत्याने वाढ होत असल्याने कृषी क्षेत्राला मोठा हातभार लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
हप्ता जमा झाला का? असे तपासा
PM-KISAN योजनेचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना त्यांचा हप्ता जमा झाला आहे की नाही हे ऑनलाइन तपासता येते.
यासाठी अधिकृत संकेतस्थळ pmkisan.gov.in ला भेट द्यावी. त्यानंतर ‘Know Your Status’ या पर्यायावर क्लिक करून नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकावा. त्यानंतर CAPTCHA भरून मोबाईलवर आलेल्या OTP द्वारे पडताळणी केल्यास हप्ता खात्यात जमा झाला आहे की नाही याची माहिती मिळू शकते.
हप्ता कसा काढायचा?
हप्ता खात्यात जमा झाल्यानंतर शेतकरी ही रक्कम थेट आपल्या बँकेतून काढू शकतात. बँक दूर असल्यास जवळच्या सामान्य सेवा केंद्र (CSC), रास्त भाव दुकान (FPS), बचत गट (SHG) किंवा शेतकरी उत्पादक संस्था (FPO) यांच्या माध्यमातूनही पैसे काढता येतात.
