जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आलमगाव येथील प्रल्हाद येळेकर यांनी वडिलांच्या सल्ल्यानुसार जांभूळ शेतीचा पर्याय निवडला. कोकण विद्यापीठाने विकसित केलेली कोकण भरवली ही जांभळाची जात त्यांनी आपल्या शेतामध्ये लावली आहे. दीड एकर शेतामध्ये पंधरा बाय 16 अंतरावर 300 जांभळांची झाडे लावण्यात आली. 2015 मध्ये या रोपांची लागवड करण्यात आली.
Agriculture: शेतकऱ्यानं डोकं लावलं, दीड एकरात लावला देशी शेवगा, पावडर विकून लाखात कमाई
advertisement
तब्बल 6 ते 7 वर्ष या झाडांना पाहिजे त्या प्रमाणात फळे लागत नव्हती. त्यामुळे निराश झालेले येळेकर बाग काढून टाकण्याच्या विचारात होते. परंतु आठव्या वर्षी त्यांच्या बागेला चांगली जांभळे लागली. यानंतर उत्पादनात वाढ होण्यास सुरुवात झाली.
मागील वर्षी त्यांना या जांभूळ शेतीमधून तब्बल 8 लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळालं. यावर्षी 10 ते 12 लाखांचे निव्वळ उत्पन्न जांभूळ शेतीमधून झाले आहे. व्यापारी जाग्यावरूनच जांभळांची दीडशे ते दोनशे रुपये प्रति किलो या दराने खरेदी करत आहेत. एका झाडावर साधारणपणे 40 किलो जांभळं निघत असल्याचे येळेकर यांनी सांगितलं.
मराठवाड्यात पारंपरिक पिकांपेक्षा इतर फळपिक फायदेशीर ठरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी काहीतरी नवीन उत्पन्न वाढवावं आणि प्रगती करावी, असं आवाहन तरुण शेतकरी प्रल्हाद येळेकर यांनी नव तरुणांना केले आहे.