मागील वर्षी मिरचीच्या दरात झालेली वाढ ही मुख्यतः बाजारातील मागणी आणि उत्पादनात असलेल्या कमतरतेमुळे झाली होती. त्या वेळी मार्केटमध्ये मिरचीची मोठी मागणी होती, मात्र पुरवठा तुलनेने कमी असल्याने दरही चांगले मिळाले. हा अनुभव लक्षात घेता, यंदा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली.
advertisement
मात्र, यावर्षी स्थिती उलटी झाली. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मिरचीची लागवड केली, त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ झाली. त्याचवेळी, बाजारातील मागणी मात्र स्थिर राहिली किंवा किंचित घटली. परिणामी, मिरच्यांच्या दरात घसरण झाली आणि शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरलं. दर कमी मिळाल्याने उत्पादन खर्चही निघणं कठीण झालं आहे.
मिरची उत्पादक शेतकरी दयानंद पवार यांनी सांगितले की, गेल्या वर्षी मिळालेल्या चांगल्या दरामुळे आम्ही यावर्षी मोठ्या प्रमाणावर मिरचीची लागवड केली. मात्र, उत्पादन वाढल्यामुळे मार्केटमध्ये आवक जास्त झाली आणि त्यामुळे दर कोसळले. शेतकऱ्यांनी अपेक्षित उत्पन्न गमावलं.
यामुळे, सरकारने आणि कृषी विभागाने शेतकऱ्यांना पीक नियोजनासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. बाजारपेठेतील मागणीचा अंदाज घेऊन पीक निवड केली पाहिजे. तसेच, मिरचीसारख्या नगदी पिकांना साठवणूक सुविधा, प्रक्रिया उद्योग आणि थेट बाजार उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांचे नुकसान टाळता येऊ शकते.





