२३ व्या वर्षी करोडपती
अवघ्या २३ व्या वर्षी सौरभ यांनी महिन्याला पाच ते सहा कोटी रुपयांची उलाढाल गाठली आहे. पुण्याजवळील हिंजवडीपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या चांदखेड गावात त्यांनी गावरान कोंबडीपालनाचा प्रकल्प सुरू केला. विशेष म्हणजे त्यांनी केवळ स्वतःपुरता व्यवसाय न करता राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांना या उपक्रमाशी जोडले आहे. आज त्यांच्या नेटवर्कमध्ये साडेतीन हजारांहून अधिक शेतकरी कार्यरत असून राज्यभरात सुमारे ५२ लाख देशी पक्ष्यांचे संगोपन केले जात आहे.
advertisement
खेळाच्या आवडीपासून उद्योगविश्वापर्यंत
सौरभ यांची सुरुवात मात्र वेगळीच होती. त्यांना कबड्डी खेळाची आवड होती आणि त्या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा होती. शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी त्यांनी गावरान अंड्यांचा शोध घेतला; मात्र बाजारात ती सहज उपलब्ध होत नव्हती. याच गरजेतून व्यवसायाची कल्पना सुचली. त्यांच्या वडिलांचा वडापावचा व्यवसाय होता. त्यांनी काही गावरान कोंबड्या आणून दिल्यानंतर सौरभ यांनी १७ व्या वर्षी छोट्या प्रमाणात सुरुवात केली. हळूहळू ग्राहकांचा प्रतिसाद वाढत गेला आणि त्यांनी या संकल्पनेला उद्योगरूप दिले.
या उपक्रमासाठी त्यांनी स्वतःची Nature's Best नावाची कंपनी स्थापन केली. कंपनीमार्फत शेतकऱ्यांना पिल्ले, खाद्य व्यवस्थापन, विक्री नेटवर्क आणि प्रशिक्षण दिले जाते. अंडी व कोंबड्यांची विक्री संघटित पद्धतीने केली जाते.
नैसर्गिक पद्धतीवर भर
सौरभ यांच्या मते, गावरान कोंबडीपालनाचे वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिक संगोपन. कोंबड्यांसाठी मोकळे वातावरण तयार केले जाते. शेवग्याच्या बागेत पक्षी मुक्तपणे फिरतात, पाला खातात आणि बांबूवर झोपतात. अंडी घालण्यासाठी पुनर्वापर करता येतील अशा तेलाच्या डब्यांचा उपयोग केला जातो. पक्ष्यांना भाजीपाल्याचे अवशेष, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, कडधान्ये आणि मेथीघास दिला जातो. या पारंपरिक आहारामुळे अंड्यांची चव आणि गुणवत्ता टिकून राहते.
बाजारपेठ आणि उलाढाल
सध्या पुणे आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये देशी कोंबडीला मोठी मागणी आहे. सौरभ यांच्या नेटवर्कमधून गावरान चिकन सुमारे हजार रुपये किलो दराने विकले जाते, तर अंडी प्रत्येकी सुमारे २० रुपयांना उपलब्ध होतात.
