सोयाबीन उत्पादन घटणार
उद्योगातील जाणकारांच्या अंदाजानुसार, देशातील सोयाबीन उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ ते २० टक्क्यांनी घटू शकते. मागील हंगामात सुमारे १२५ लाख टन सोयाबीन उत्पादन झाले होते. मात्र यंदा ते ९५ ते १०० लाख टनांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. मुंगे इंडियाचे संचालक विद्याभूषण यांनी सांगितले की, सध्या पिकाचे काढणीचं काम सुरू आहे आणि पावसामुळे होणाऱ्या नुकसानीमुळे उत्पादनाचा अचूक अंदाज येण्यासाठी अजून काही काळ थांबावं लागेल.
advertisement
कमी भावामुळे वापर वाढला
तर दुसरीकडे गेल्या वर्षभर सोयाबीन आणि सोयापेंड स्वस्त मिळत असल्याने देशांतर्गत वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. देशात जवळपास १५५ लाख टन सोयाबीन गाळप झाले, तर ९० ते ९५ लाख टन सोयापेंडचा वापर झाला. यातील ७० ते ७५ लाख टन देशांतर्गत वापर होता, तर उर्वरित निर्यात झाली. मानवी खाद्यातील वापरही वाढल्याने साठे संपले. यामुळे नवीन हंगामावर दबाव वाढला आहे.
जाणकारांचा अंदाज
यंदा देशात सोयाबीन लागवडीत ५ ते ७ टक्क्यांची घट झाली आहे. त्यात पावसाचा फटका बसल्याने उत्पादन १० ते १२ टक्क्यांनी कमी होईल. त्यांचा अंदाज आहे की, देशातील उत्पादन ९८ लाख टनांच्या आसपास राहील. मात्र या वेळी सोयाबीनची गुणवत्ता घटण्याची शक्यता असल्याने गाळप उद्योगांना अडचणी येऊ शकतात. असं मत जानकरांनी व्यक्त केले आहे.
बाजारभावाचा कल कसा असणार?
सध्या जुने सोयाबीन बाजारात ४,३०० ते ४,४०० रुपये क्विंटल दराने विकले जात आहे, तर नव्या सोयाबीनला ४,७०० रुपयांपर्यंत भाव मिळतो आहे. यामध्ये आर्द्रता २० ते २५ टक्क्यांदरम्यान असल्याने प्रत्यक्ष भाव थोडा कमी ठरतो. मात्र उत्पादनात घट झाल्यास दरात मोठी वाढ होईल.अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मध्य प्रदेशची भावांतर योजना
सोयाबीनच्या बाजारावर मध्य प्रदेश सरकारच्या भावांतर योजनेचाही परिणाम दिसू शकतो. या योजनेत शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दरात विक्री केली, तर सरकार फरक भरून काढेल. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव मिळेल, पण बाजारभावावर काही काळ दबाव येऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, उत्पादन घट झाल्याने बाजारभाव वाढायला हवेत, पण भावांतर योजनेमुळे ते तितके वाढणार नाहीत.
सोयाबीन पेंड आणि आंतरराष्ट्रीय बाजार
देशातील सोयाबीन उत्पादन कमी झाल्याने सोयापेंडचेही उत्पादन घटेल. त्यामुळे स्थानिक मागणी भागवण्यासाठी कमी माल उपलब्ध राहील. निर्यातीत घट होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही मागील वर्षभर दबाव होता. मात्र यंदा भारतातील कमी पुरवठ्याचा परिणाम जागतिक दरांवरही दिसू शकतो.
शेतकऱ्यांसाठी संधी आणि आव्हान
सध्या शेतकऱ्यांना भावाच्या बाबतीत काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. पण पिकाचं नुकसान आणि गुणवत्तेतील घसरण यामुळे त्यांना तोटा टाळता येणार नाही. तज्ज्ञांच्या मते, बाजारभाव १५ ते २० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
एकूणच, यंदा सोयाबीन उत्पादन घटणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. कमी भावामुळे वाढलेला वापर, पावसामुळे झालेलं नुकसान, संपलेले साठे आणि वाढती मागणी या सर्व गोष्टींमुळे बाजारभावाला आधार मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी हा हंगाम भावाच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकतो, पण उत्पादन घट आणि पिकाच्या गुणवत्तेची समस्या त्यांना आव्हान देणारी असेल.