अतिवृष्टीमुळे शेतीला मोठा फटका
आर्थिक पाहणी अहवालानुसार, खरीप हंगामातील अतिवृष्टी आणि काही भागांत आलेल्या पुरामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले. याचा थेट परिणाम उत्पादनावर झाला असून कृषी क्षेत्राच्या एकूण वाढीवरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. शेतीसोबतच दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसायाच्या उत्पन्नातही घट झाल्यामुळे कृषी आणि संबंधित क्षेत्रांच्या विकासदरावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
advertisement
खरीप उत्पादनात घट होण्याचा अंदाज
अहवालानुसार, यंदा खरीप पिकांच्या उत्पादनात सुमारे ६.६ टक्क्यांची घट होण्याची शक्यता आहे. विशेषतः कडधान्य आणि तेलबिया पिकांना मोठा फटका बसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कडधान्यांच्या उत्पादनात २८.२ टक्के, तर तेलबियांच्या उत्पादनात २९.७ टक्के घट अपेक्षित आहे.
तसेच प्रमुख पिकांच्या उत्पादनातही लक्षणीय घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तांदळाच्या उत्पादनात ४.६ टक्के, ज्वारीत ४४.१ टक्के, बाजरीत ३०.९ टक्के आणि नाचणीमध्ये १५.८ टक्के घट होऊ शकते. तूर पिकाच्या उत्पादनात २९.२ टक्के घट होण्याचा अंदाज असून सोयाबीनच्या उत्पादनात तब्बल ४८.९ टक्क्यांची घट अपेक्षित आहे. भुईमुगाच्या उत्पादनात १७.१ टक्के तर एकूण तेलबिया उत्पादनात सुमारे ४७.४ टक्के घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
कापूस आणि ऊस पिकांबाबत मिश्र चित्र
कापूस आणि ऊस पिकांच्या बाबतीत मात्र काही प्रमाणात वेगळे चित्र दिसत आहे. कापसाखालील क्षेत्रात घट होण्याची शक्यता असली तरी उत्पादनात १०.८ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे उसाच्या उत्पादनात सुमारे ६.६ टक्क्यांची घट अपेक्षित असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
ज्वारी, करडई, सूर्यफूल, जवस आणि इतर तेलबिया पिकांच्या क्षेत्रातही घट होण्याची शक्यता आहे. परिणामी या पिकांच्या उत्पादनात सुमारे २२.७ टक्क्यांची घट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पेरणी क्षेत्रात किरकोळ घट
खरीप हंगामातील एकूण पेरणी क्षेत्र मागील वर्षाच्या तुलनेत ०.६ टक्क्यांनी कमी झाले आहे. मात्र काही पिकांच्या क्षेत्रात वाढही दिसून आली आहे. ऊस आणि मका पिकांच्या क्षेत्रात अनुक्रमे ३०.२१ टक्के आणि सुमारे १७ टक्के वाढ झाल्याचे आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे.
फलोत्पादन क्षेत्रात वाढ
राज्यातील फलोत्पादन क्षेत्रात मात्र सकारात्मक चित्र दिसत आहे. २०२४-२५ या वर्षात फलोत्पादन पिकांखालील क्षेत्र सुमारे २५.१९ लाख हेक्टरपर्यंत पोहोचले असून त्यामध्ये १५.९ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
या क्षेत्रात आंबा १.६७ लाख हेक्टर, संत्री १.४८ लाख हेक्टर, केळी १.४१ लाख हेक्टर, द्राक्ष १.१९ लाख हेक्टर आणि डाळिंब १.७ लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. तसेच मोसंबीची लागवड सुमारे ०.८० लाख हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली आहे.
सेंद्रिय शेतीत महाराष्ट्र आघाडीवर
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सेंद्रिय शेती उत्पादनांना मोठी मागणी वाढत आहे. राज्यातील सेंद्रिय शेतीखालील क्षेत्रात मागील वर्षाच्या तुलनेत काही प्रमाणात घट झाली असली तरीही देशात सुमारे ३० टक्के वाटा राखून महाराष्ट्र सेंद्रिय शेतीत पहिल्या क्रमांकावर असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
