जालना : मोसंबीचे आगार म्हणून जालना जिल्हा ओळखला जातो. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मोसंबी बाजारात सध्या आंब्या बहाराच्या मोसंबीला चांगला दर मिळत आहे. मोसंबीची दररोज 25 ते 30 टन एवढी अत्यल्प आवक होत असल्याने चांगला दर मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितलं. 5 आणि 6 नोव्हेंबर रोजी उत्तर भारतात छटपूजा असल्याने मृग बहाराच्या मोसंबीलाही चांगला दर मिळाला. मात्र आता मृग बहाराच्या मोसंबीला मागणी नसल्याने शेतकऱ्यांनी 15 डिसेंबर नंतरच मृग बहाराच्या मोसंबीची विक्री करावी, असं आवाहन व्यापाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
advertisement
जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात पिकणारी मोसंबी ही उत्तर भारतामध्ये प्रसिद्ध आहे. चवीला अतिशय गोड असणारी महाराष्ट्रातील मोसंबी उत्तर भारतामध्ये मोठ्या चवीने खाल्ले जाते. दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये जालना शहरातून मोसंबीची निर्यात केली जाते. हंगामामध्ये दररोज 700 ते 800 टन मोसंबी जालना मोसंबी बाजारात विक्रीसाठी येते आणि एवढीच मोसंबी बाहेर राज्यामध्ये विक्रीसाठी निर्यात होते. सध्या मोसंबीचा आंबिया बहार हा शेवटाकडे आला आहे.
त्यामुळे मोसंबी बाजारामध्ये आंबिया बहाराची मोसंबी ही अत्यल्प प्रमाणात आहे. त्यामुळे मोसंबीला 25 हजारांपासून ते 38 हजार रुपये प्रति टन असा चांगला दर मिळत आहे. तर मृग बहाराच्या मोसंबीला 5 हजार रुपये प्रति टन ते 10 हजार रुपये प्रति टन असा दर मिळत आहे. आगामी काळात मृगभाराची मोसंबी 25 ते 30 हजार रुपये प्रति टन या भावानेही विक्री होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी 15 डिसेंबर नंतरच विक्रीचे नियोजन करावे, असं आवाहन करण्यात आले आहे.
15 डिसेंबर पासून पुढे मृगबहाराची मोसंबी परिपक्व होण्यास सुरुवात होईल. यानंतरच शेतकऱ्यांनी मृगभाराची मोसंबी विक्रीसाठी जालना बाजारात आणावी, असं आवाहन मोसंबी अडत असोसिएशनचे अध्यक्ष नाथा पाटील घनघाव यांनी केले आहे. सध्या मृग बहाराच्या मोसंबीमध्ये ज्यूस नसल्याने बाहेर राज्यात मोसंबीला मागणी नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं संभाव्य नुकसान टाळून मृगभाराची मोसंबी जालना बाजारात विक्रीसाठी अन्न टाळावं, असं आवाहन व्यापाऱ्यांकडून करण्यात आले आहे.