हवामान बदलाच्या संकटाची चर्चा करताना एक सार्वत्रिक निराशेचा सूर जाणवतो. शेतीचे भवितव्य अंधकारमय आहे, अशीच जणू मांडणी केली जाते. परंतु प्रत्यक्षात या संकटाला तोंड देण्यासाठी शेती हे ओझे नसून ती एक खूप मोठी संधी असल्याचे मत अनेक अर्थतज्ज्ञ आणि पर्यावरण अभ्यासक मांडत आहेत. जंगल आणि शेती हे नैसर्गिक कार्बन संकुल असून ते वातावरणातील कार्बनचे प्रमाण संतुलित करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे हवामान बदलाची तीव्रता कमी होते.
advertisement
Ber Farming: बोराची शेती परवडेना, शेतकऱ्यानं लावलं डोकं; आता अर्ध्या एकरात 4,00,000 उत्पन्न!
पर्यावरण आणि जैवविविधतेचे संवर्धन झाले तर अनेक इकोसिस्टिम सेवा पुरवता येतात. नैसर्गिक परिसंस्था, जैवविविधता वाढली की कार्बन ऑफसेट, जैवविविधता क्रेडिट्स वगैरेमधून चांगले उत्पन्न मिळवण्याच्यादेखील संधी दिसतात. आपण मातीवर शेती करतो, म्हणून मातीची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत प्रयोगशील शेतकरी विनोद तोडकर यांनी लोकल 18 सोबत बोलताना व्यक्त केले.
अशी घ्या मातीची काळजी
उसाची शेती करताना उसाचा पाला न जाळता त्याची शेतातच कुट्टी करावी. शेतातील कुठल्याही प्रकारचा पालापाचोळा, पिकांचे अवशेष जाळून न टाकता त्याचा सेंद्रिय खत निर्मितीसाठी वापर करावा. मातीची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करताना तागासारखे एखादे पीक मातीमध्ये गाढावे. जमिनीमध्ये वर्षानुवर्षे एकच पीक घेण्याऐवजी पिकामध्ये फेरपालट करायला हवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतामध्ये करंजीपेंड, निंबोळी पेंड यांसारख्या खतांच्या वापराकडे विशेष लक्ष द्यावे.
मातीची योग्य ती काळजी घेऊन मातीचे आरोग्य सुधारले तर पीक व्यवस्थापनासाठी येणाऱ्या खर्चामध्ये मोठी बचत होत असल्याचा अनुभवदेखील विनोद तोडकर सांगतात. याशिवाय विषमुक्त उत्पादने मिळवण्यासाठी मातीची योग्य ती काळजी घेणे सर्वात प्राथमिक आणि अत्यंत महत्त्वाची कृती असल्याचे शेतीनिष्ठ विनोद तोडकर यांनी सांगितले.