धाराशिव जिल्ह्यात 35,403 शेतकऱ्यांनी सरकारी सोयाबीन खरेदी केंद्रासाठी नोंदणी केली होती. मात्र, प्रत्यक्षात फक्त 14,257 शेतकऱ्यांचेच सोयाबीन खरेदी करण्यात आले. खरेदी केंद्राची मुदत संपल्याने 21,000 शेतकऱ्यांची सोयाबीन विक्री रखडली आहे.
खरेदी थांबल्याने शेतकरी चिंतेत
हमीभावानुसार सोयाबीन खरेदीची मुदत संपल्याने राज्यभरातील शेतकरी चिंतेत आहेत. अनेक शेतकऱ्यांकडे अजूनही मोठ्या प्रमाणात सोयाबीन शिल्लक आहे. मात्र खरेदी केंद्र बंद झाल्याने त्यांना पुढे काय करावे, हा मोठा प्रश्न पडला आहे.
advertisement
तीव्र आंदोलनाचा दिला इशारा
सोयाबीन खरेदी बंद झाल्यामुळे किसान सभा आक्रमक झाली आहे. केंद्र सरकारने खरेदीची मुदत त्वरित वाढवावी आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा किसान सभेने दिला आहे. मात्र, सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
हमीभाव आणि बाजारभावातील मोठी तफावत
सध्या खुल्या बाजारात सोयाबीनचे दर 3,800 ते 4,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहेत, तर हमीभाव 4,851 रुपये प्रति क्विंटल आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रांवर नोंदणी केली असली तरी अद्याप त्यांची खरेदी पूर्ण झालेली नाही.
सोयाबीनचे नेमकं करायचं काय?
किसान नेते रविकांत तुपकर यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली आहे. "राज्यात 60 ते 65 लाख मेट्रिक टन सोयाबीन उत्पादन होत असताना सरकार केवळ 13 लाख मेट्रिक टन खरेदी करणार आहे. आतापर्यंत फक्त 7 ते 8 लाख मेट्रिक टनच खरेदी झाले आहे. उरलेले सोयाबीन आम्ही कुठे फेकायचे?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, राज्यभरातील शेतकरी आता सरकारच्या पुढील निर्णयाची वाट पाहत आहेत. खरेदी मुदतवाढ न झाल्यास मोठे आंदोलन उभे राहू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.