हवामान विभागाचा इशारा
रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसह पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यांवर आज जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, याठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, नागपूर, वर्धा अशा जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता असून, त्याठिकाणी सतर्कतेचा इशारा जारी आहे.
advertisement
वातावरणीय परिस्थिती
तेलंगणा आणि विदर्भ परिसरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्याच्याशी संलग्नित ४.५ किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. ही प्रणाली वायव्येकडे सरकत असून, तिची तीव्रता हळूहळू कमी होण्याचे संकेत आहेत. याशिवाय, वायव्य अरबी समुद्र आणि आग्नेय बंगालच्या उपसागरातही चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती दिसून येत आहेत.
पावसाचा जोर
राज्यात गेल्या २४ तासांत पावसाची तीव्रता वाढलेली दिसली. मराठवाड्यातील पैठण (छत्रपती संभाजीनगर) येथे तब्बल २०० मिमी पावसाची नोंद झाली. तर ब्रह्मपुरी येथे ३४.८ अंश सेल्सिअस उच्चांक तापमान नोंदले गेले. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि घाटमाथा भागात मध्यम ते जोरदार पाऊस झाला, तर विदर्भात हलका ते मध्यम पाऊस पडला. अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
ऑरेंज अलर्ट : रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा.
येलो अलर्ट (जोरदार पावसाचा इशारा): मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, अहमदनगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, नागपूर, वर्धा.
येलो अलर्ट (विजांसह वादळी पावसाचा इशारा): नंदूरबार, धुळे, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया.
शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
राज्यात खरीप हंगामातील अनेक पिके आता परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहेत. अशा वेळी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
भात पिकासाठी: पिके पडू नयेत म्हणून शेतातील पाणी वेळेवर काढून टाका. पिकांना आधार देण्यासाठी बांधणी करा.
सोयाबीन व कडधान्ये: अतिवृष्टीमुळे दाणे सडण्याची शक्यता असल्याने पिके काढणीस तयार असतील तर विलंब न करता काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणीस ठेवा.
भाजीपाला: पिके कुजण्याची शक्यता असल्याने निचरा व्यवस्थेवर भर द्या.
फळबागा: विशेषतः डाळिंब, द्राक्षे व केळी बागांमध्ये पाणी साचू देऊ नका. फळांवर रोगराई येऊ नये म्हणून योग्य वेळी फवारणी करा.