मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा तडाखा सुरू असताना, बंगालच्या उपसागरात सतत तयार होणाऱ्या कमी दाबाच्या प्रणालींमुळे महिन्याअखेरीस पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. आज (२४ सप्टेंबर) उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह वादळी पावसाचा अंदाज असून, हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
बंगालच्या उपसागरातील स्थिती
सध्या बंगालच्या उपसागरात पश्चिम बंगाल आणि ओडिशा किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. या प्रणालीपासून दक्षिण-मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. मध्य महाराष्ट्रात समुद्रसपाटीपासून सुमारे ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. याशिवाय, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात गुरुवारपर्यंत (२५ सप्टेंबर) दक्षिण ओडिशा व उत्तर आंध्र प्रदेश किनाऱ्यालगत आणखी एक कमी दाब क्षेत्र तयार होणार असून, किनाऱ्याजवळ सरकत असताना ही प्रणाली अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे.
पावसाची परिस्थिती
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी होत असून, नद्या-नाले तुडुंब भरले आहेत. कोकण व घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार सरी कायम आहेत. मंगळवारी (२३ सप्टेंबर) सकाळपर्यंतच्या २४ तासांत अहिल्यानगरच्या शेगावमध्ये तब्बल १६० मिमी पावसाची नोंद झाली, जी राज्यातील सर्वाधिक आहे. दरम्यान, विदर्भात तापमान सतत तिशीपार असून, ब्रह्मपुरी येथे कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस इतके उच्चांक गाठले.
पुढील काही दिवसांचा अंदाज
आज (२४ सप्टेंबर) गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा आहे. उर्वरित महाराष्ट्रातही विजांसह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने येलो अलर्ट जारी करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. शुक्रवारपासून (२६ सप्टेंबर) राज्यातील विविध भागांत पुन्हा पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज आहे.
मॉन्सूनचा परतीचा प्रवास
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) परतीचा प्रवास सुरू केला आहे. १४ सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानमधून परतण्यास सुरुवात झाली असून, २२ सप्टेंबरला गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या काही भागांतून मॉन्सूनची माघार झाली आहे. आज (२४ सप्टेंबर) गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाबसोबतच दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांतून मॉन्सूनची आणखी माघार होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाचा अलर्ट
जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : गोंदिया, गडचिरोली. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, अमरावती, यवतमाळ.
शेतकऱ्यांसाठी सल्ला काय?
सध्याच्या हवामान पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. पिकांची नासधूस टाळण्यासाठी शेतातील पाण्याचा निचरा होईल याची काळजी घ्या. सोयाबीन, कपाशी, तूर यांसारख्या पिकांवरील कीड व रोगनियंत्रणासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. भातशेतीत पाणी साचून राहू नये म्हणून बांधबंदिस्ती आणि निचरा व्यवस्थापन करा. जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवा, जेणेकरून पावसापासून संरक्षण मिळेल.