शेंदुरजना घाट येथील प्रगतशिल शेतकरी उध्दवराव गुलाबराव फुटाणे लोकल 18 शी बोलताना सांगतात की, माझ्याकडे वडिलोपार्जित 12 एकर ओलिताची शेती होती. त्यात काही संत्रा पीक होते. त्याचबरोबर काही भागांत वडिलांनी नर्सरीचा व्यवसाय सुरू केला होता. घरची परिस्थिती फार काही बरी नव्हती. खाऊन पिऊन ठीक होती. काही शिल्लक राहील किंवा मागावे लागेल असं नव्हतं. मी शिक्षण घेत असताना माझा नंबर बेंगलोर येथे इंजिनिअरिंगसाठी लागला होता. मात्र, शेती हा व्यवसाय होता. आणि त्यात वडील एकटे होते. त्यामुळे मी तिकडे न जाता वरुडलाच माझे शिक्षण सुरू ठेवले. तेव्हाच काही दिवस संत्राचा धंदा केला. त्यातून पैसे जमा करून मी ट्रॅक्टर खरेदी केला. त्याकाळात महागाई नसल्याने हे सर्व शक्य होतं.
advertisement
नोकरी सोडली, विकायला लागला सोडा, तीन महिन्यात तरुणाची दीड लाखाची उलाढाल
वांगीच्या लागवडीतून भरभराट
त्यानंतर मी शेतीकडे लक्ष द्यायला सुरवात केली. तेव्हा काही काळानंतर लक्षात आले की, आपली जमीन ही संत्रा पिकांसाठी उपयुक्त नाही. यात झाडे आहेत याचं आयुष्य खूप कमी आहे. तेव्हा 1989 मध्ये मी वांगीची लागवड केली. वडील नाही म्हणत होते. बगीचा तोडून वांगी लागवड करू नको. पण, मी हिम्मत केली आणि 3 एकरमध्ये वंगीची लागवड केली. तेव्हा वाटलं होत की, 2 ते 3 लाख रुपये होईल. पण, त्यात मला 6.50 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. तेव्हापासून माझी भरभराट सुरू झाली. काही दिवस गावचा सरपंच होतो. तेव्हा सुद्धा गावात नवनवीन प्रयोग सुरू केले.
उध्दव नर्सरी ब्रँड तयार केला
त्यानंतर वडिलांची पारंपरिक नर्सरी ही ब्रँड बनवायची असा विचार केला. तेव्हा वडिलांच्या लायसन्सवर मी उध्दव नर्सरी सुरू केली. त्यात नवनवीन प्रयोग केले. ज्या नर्सरीतून वर्षाला 20 ते 30 हजार झाडं जात होती. त्यातून आता 3 ते 4 लाख झाडं सहज जातात. त्याची आधीच बुकिंग सुरू होते. त्याचबरोबर इतरांच्या तुलनेत झाडांची क्वालिटी सुद्धा वेगळी असते. नर्सरित संत्रा, मोसंबी, लिंबू हे सर्व रोप उपलब्ध असतात. त्यानंतर कालांतराने वडिलोपार्जित शेतीमध्ये मी वाढ केली. 12 एकर शेतीतून आतापर्यंत 75 एकर शेती मी जुळवली आहे. यासाठी अतिशय परिश्रम घ्यावे लागले. रात्रंदिवस मेहनत करावी लागली. त्याचेच हे आता फळ आहे.
क्रेट निर्मिती उद्योग स्थापन
नर्सरी व्यवसायबरोबर आता मी माझ्या मुलाच्या सहकार्याने माऊली क्रेट कंपनी सुद्धा उभारली आहे. मुलाचे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाले आहे. तो आता ही कंपनी सांभाळतो आहे. तेथील क्रेट सुद्धा परराज्यात पाठवले जाते. त्याचबरोबर धर्मकाटा, संत्रा मंडी सुद्धा माझ्याकडे आहे. वयाच्या 18 व्या वर्षापासून शेतीत लागलो आणि त्यातूनच आज हे सुखाचे दिवस बघायला मिळत आहे, असे उद्धव सांगतात.
संत्राचे वार्षिक उत्पन्न किती?
40 एकर संत्रा बगीचा सध्या माझ्याकडे आहे. त्यातून मला वार्षिक उत्पन्न 50 लाखांपर्यंत मिळते. त्याचबरोबर नर्सरी व्यवसायातून सुद्धा उत्पन्न सद्या मिळत आहे. पुढेही यात मी नवनवीन प्रयोग करत राहणार आहे. शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौरा सुद्धा घेणार आहे. शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात जास्त उत्पादन कसं घ्यायचं? यावर सुद्धा मार्गदर्शन दिले जाणार आहे, असेही ते सांगतात.