केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अटल पेन्शन योजनेला मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली. यासोबतच या योजनेसाठी प्रचार, जनजागृती आणि विकासात्मक उपक्रमांसाठी निधी समर्थन तसेच गॅप फंडिंगमध्ये वाढ करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. सरकारचा उद्देश अधिकाधिक नागरिकांना या योजनेत सहभागी करून वृद्धापकाळातील उत्पन्न सुरक्षा मजबूत करण्याचा आहे.
अटल पेन्शन योजना कधी सुरू झाली?
advertisement
९ मे २०१५ रोजी केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना सुरू केली. असंघटित क्षेत्रातील कामगार, लहान शेतकरी, मजूर आणि स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींना वृद्धापकाळात नियमित पेन्शन मिळावी, हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. सरकारकडून देण्यात येणारी ही सामाजिक सुरक्षा योजना आज लाखो लोकांचा आधार बनली आहे. १९ जानेवारी २०२६ पर्यंत देशभरात ८६.६ दशलक्षांहून अधिक नागरिकांनी या योजनेत नोंदणी केली आहे.
अटल पेन्शन योजना काय आहे?
अटल पेन्शन योजना ही सरकार समर्थित पेन्शन योजना आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला वयाच्या ६० व्या वर्षानंतर दरमहा १,००० ते ५,००० पर्यंत निश्चित पेन्शन मिळते. पेन्शनची रक्कम लाभार्थ्याने निवडलेल्या पर्यायावर अवलंबून असते. लाभार्थ्याच्या मृत्यूनंतर ही पेन्शन त्यांच्या पती किंवा पत्नीस दिली जाते. दोघांच्याही मृत्यूनंतर जमा झालेली संपूर्ण रक्कम नामनिर्देशित व्यक्तीला परत दिली जाते.
अटल पेन्शन योजनेचा लाभ कसा घ्यावा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे गरजेचे आहे. आधार कार्ड आणि मोबाईल नंबर खातेाशी लिंक असणे अनिवार्य आहे.
लाभार्थ्याला त्यांच्या वयानुसार आणि निवडलेल्या पेन्शन रकमेनुसार ठराविक मासिक योगदान द्यावे लागते. हे योगदान ऑटो-डेबिट पद्धतीने थेट खात्यातून वसूल केले जाते. अर्जासाठी जवळच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अटल पेन्शन योजना अर्ज भरावा लागतो.
पात्रता निकष काय आहेत?
अटल पेन्शन योजनेसाठी काही ठराविक पात्रता निकष आहेत.
अर्जदार भारतीय नागरिक असावा
वय १८ ते ४० वर्षे असणे आवश्यक
बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे गरजेचे
ईपीएफ, ईपीएस किंवा कोणत्याही सरकारी पेन्शन योजनेचा लाभार्थी नसावा आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक असणे बंधनकारक
