जालना जिल्ह्यातील बदनापूर, घनसावंगी, अंबड, भोकरदन, जाफराबाद तसेच जालना तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसात उन्हाळी चारा, ज्वारी, बाजरी तसेच आंबा आणि बीज उत्पादनासाठी घेतल्या जाणाऱ्या कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसामुळे विविध ठिकाणी असलेल्या विवाह सोहळ्याच्या मंडपाची वाताहत झाली. नागरिकांची देखील अचानक आलेल्या पावसामुळे भंबेरी उडाल्याचे पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी कडब्याचे नुकसान झाले.
advertisement
जालना तालुक्यातील दहिफळ येथील नितीन उद्धवराव काळे या शेतकऱ्याने एक एकर उन्हाळी ज्वारीची पेरणी केली होती. ज्वारीची कापणी पूर्ण झाली होती तर खुडणी अर्ध्यावर आली असताना सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस आला. यामुळे ज्वारीचे मोठे नुकसान झाले. ज्वारीची कणसं काळवंडली असून त्याला बाजारात आता मातीमोल भाव मिळणार आहे.
आम्ही अन्नधान्यासाठी ज्वारीची लागवड केली होती परंतु आम्ही जे करतो त्यात नुकसानच होते. खाय-प्यायला काहीतरी होईल म्हणून ही ज्वारी लावली होती पण पावसाने वाट लावली आता अन्नधान्याची सोय कशी करावी, अशी व्यथा द्रौपदी काळे या महिला व्यक्त करतात.





