कोविडमध्ये दिशा मिळाली
लहानपणापासूनच त्याने शेतकऱ्यांचे कष्ट, निसर्गावरचं अवलंबित्व आणि अपुऱ्या साधनांमुळे होणारे नुकसान जवळून पाहिले. बी.एस्सी. आणि शेतीशी संबंधित शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला बेंगळुरूमध्ये चांगली नोकरी मिळाली. आर्थिक स्थैर्य मिळालं असलं, तरी गावाकडील शेतकऱ्यांची अवस्था त्याच्या मनाला सतावत होती. परदेशात उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न त्याने पाहिलं होतं, मात्र कोविड-१९ लॉकडाऊनमुळे तो गावाकडे परतला आणि तिथेच त्याच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली.
advertisement
गावी परतल्यानंतर प्रिन्सने शेतकऱ्यांच्या समस्यांचा सखोल अभ्यास केला. बनावट आणि महागडी बियाणे, रासायनिक खतांचा अतिरेकी वापर, जुनी उपकरणे आणि बाजारपेठेचा अभाव यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेले दिसले. तेव्हाच त्याने ठरवलं की, शेतीला आधुनिक, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि नफ्याचं स्वरूप द्यायचं. परदेशात जाण्याचं स्वप्न बाजूला ठेवून त्याने शेतीलाच आपलं करिअर बनवलं.
१ लाखांच्या भांडवलापासून सुरुवात
प्रिन्सने केवळ १ लाख रुपयांच्या भांडवलात एका छोट्याशा खोलीतून “AGRATE” या कृषी स्टार्टअपची मुहूर्तमेढ रोवली. सुरुवातीला उच्च दर्जाची बियाणे, सेंद्रिय खते आणि आधुनिक शेतीची साधने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं, हे त्याचं उद्दिष्ट होतं. मात्र लवकरच त्याला जाणवलं की, केवळ साहित्य पुरवणं पुरेसं नाही. शेतकऱ्यांना ज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड देणं गरजेचं आहे.
त्यामुळे प्रिन्स गावोगावी फिरू लागला. त्याने १०,००० हून अधिक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. व्हिडिओ कॉल, कार्यशाळा, प्रशिक्षण सत्रे आणि मोबाईल अॅप्सच्या माध्यमातून योग्य पेरणी पद्धती, जलसंधारण, सेंद्रिय शेती आणि खर्च कमी करून उत्पादन वाढवण्याचे मार्ग शिकवले.
लोकांनी चेष्टा केली
सुरुवातीला प्रिन्सच्या निर्णयाची खिल्ली उडवण्यात आली. “इतकी चांगली नोकरी सोडून शेती?” अशा टोमण्यांचा त्याला सामना करावा लागला. काहींनी तर त्याला अपयशी ठरवून मोकळे झाले. मात्र प्रिन्स डगमगला नाही. त्याच्या मार्गदर्शनामुळे अनेक शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट झालं, नुकसान कमी झालं आणि उत्पन्नात वाढ झाली. हळूहळू उपहास विश्वासात बदलू लागला. आज AGRATE हा केवळ पुरवठा करणारा उपक्रम राहिलेला नाही, तर शेतकऱ्यांसाठी संपूर्ण सोल्यूशन बनला आहे. शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्याचं कामही ही स्टार्टअप करते.
कोट्यवधींची कमाई
आज प्रिन्स शुक्लाच्या AGRATE या स्टार्टअपची वार्षिक उलाढाल सुमारे २.५ कोटी रु आहे. पूर्णियातून सुरू झालेला हा उपक्रम बिहारमधील अनेक जिल्ह्यांपर्यंत पोहोचला आहे. आयटीसी, पार्ले, नेस्ले यांसारख्या मोठ्या कंपन्यांशी भागीदारी करून सेंद्रिय उत्पादने पुरवली जात आहेत.
