नागपंचमीच्या दिवशी सर्प देवतेच्या मूर्ती आणि शिवलिंगाला कच्चे दूध अर्पण केलं जातं. यामुळे जीवनातील नकारात्मकता दूर होते आणि भगवान शिव आणि सर्प देवतेच्या कृपेने जीवनात सुख आणि समृद्धी येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. या वर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी २९ जुलै रोजी रात्री ११:२४ वाजता सुरू होईल आणि ३० जुलै रोजी दुपारी १२:४६ पर्यंत राहील. त्यामुळे उदयतिथीनुसार, यावर्षी नागपंचमी मंगळवार, २९ जुलै २०२५ रोजी साजरी केली जाईल. नाग पंचमीची पूजा करण्याचा सर्वोत्तम वेळ २९ जुलै रोजी सकाळी ०५:४१ ते ०८:२३ पर्यंत असेल.
advertisement
नागपंचमीची पूजा घरी कशी करावी -
या दिवशी पाटावर किंवा भिंतीवर नागाचे चित्र काढले जाते. अनेक घरांमध्ये मातीचे किंवा चांदीचे नाग आणून त्यांची विधिवत पूजा केली जाते. नागाच्या मूर्तीला किंवा चित्राला दूध, लाह्या आणि गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. दूर्वा, दही, गंध, अक्षता, फुले अर्पण करून पूजा केली जाते. नागपंचमीला उकडून केलेले पदार्थ खाण्याची प्रथा आहे, कारण या दिवशी तवा किंवा सुरी/चाकूचा वापर टाळला जातो.
काही ठिकाणी वारुळाजवळ जाऊन जिवंत नागांची पूजा करण्याची परंपरा आहे, परंतु आता वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे आणि नागांच्या आरोग्याच्या दृष्टीने याला विरोध केला जातो. तरीही, अनेक ठिकाणी प्रतीकात्मक पूजा किंवा वारुळाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला जातो.
बत्तीस शिराळा (सांगली जिल्हा) हे गाव जिवंत नागांच्या पूजेसाठी प्रसिद्ध आहे, येथे पूर्वी मोठ्या प्रमाणात जिवंत नागांची मिरवणूक काढली जात असे. मात्र, २००२ पासून कायद्याने यावर बंदी घातली आहे.
आषाढी एकादशीच्या उपवासामध्ये नेमकं काय खावंं? अनेकांकडून कोणत्या चुका होतात पहा
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
