टाटा इंडिका हा टाटांचा ड्रीम प्रोजेक्ट होता; मात्र कमी विक्रीमुळे टाटा मोटर्सला आपला कार व्यवसाय वर्षभरात विकायचा होता. यासाठी 1999 मध्ये टाटांनी फोर्ड या अमेरिकेतल्या कार उत्पादक कंपनीशी बोलण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी बिल फोर्ड कंपनीचे अध्यक्ष होते. डेट्रॉइट शहरात झालेल्या दोन्ही कंपन्यांच्या बैठकीत फोर्डच्या प्रतिनिधींनी टाटांच्या कौशल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. या बैठकीत बिल फोर्ड यांनी रतन टाटा यांचा अपमान केला होता. फोर्ड यांचं असं म्हणणं होतं, की प्रवासी कार क्षेत्राबद्दल काहीच माहिती नसताना कार व्यवसाय सुरू करून टाटांनी मोठी चूक केली. फोर्डने टाटांचा कार व्यवसाय खरेदी करण्याची तयारी दाखवून उपकाराची भाषा केली होती. हा प्रकार टाटांना अजिबात आवडला नाही. या बैठकीनंतर आपलं कार उत्पादन युनिट न विकण्याचा निर्धार करून टाटा भारतात परत आले होते.
advertisement
(रतन टाटांना भारतरत्न द्या, जोरदार मागणी, आजवर कोणाकोणाला मिळाला हा मरणोत्तर पुरस्कार?)
फायनान्शिअल एक्सप्रेसने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, 1922मध्ये स्वॅलो साइडकार कंपनी म्हणून स्थापन झालेली जग्वार ही कंपनी स्पोर्ट्स सलून आणि कारमधली प्रमुख म्हणून उदयास आली होती. 1989मध्ये फोर्ड कंपनीने 2.5 अब्ज डॉलर्समध्ये जग्वार कंपनी विकत घेतली. याशिवाय, 2000 साली फोर्डने 2.7 बिलियन डॉलर्समध्ये लँडरोव्हर कंपनीदेखील खरेदी केली; पण त्या ब्रँडचं पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नात फोर्डला आर्थिक नुकसान, तीव्र स्पर्धा आणि गुणवत्तेच्या समस्या यांसारख्या अडथळ्यांचा सामना करावा लागला.
2008मध्ये जेव्हा जागतिक आर्थिक मंदी आली तेव्हा फोर्डला गंभीर आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. फोर्ड कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर गेली होती. तोपर्यंत रतन टाटा यांनी टाटा मोटर्स ही ऑटोमोटिव्ह क्षेत्रातली एक महत्त्वाची कंपनी म्हणून प्रस्थापित केली होती. टाटा मोटर्सने 2008मध्ये फोर्डकडून जग्वार आणि लँडरोव्हर हे दोन्ही ब्रँड्स फक्त 2.3 अब्ज देऊन खरेदी केले. टाटांनी पूर्ण केलेला हा व्यवहार म्हणजे त्यांच्या अपमानाचा बदला होता.
अधिग्रहणानंतर फक्त एका वर्षानंतर जग्वार आणि लँडरोव्हरने टाटांना नफा मिळवून देण्यास सुरुवात केली. जागतिक आर्थिक वातावरण आव्हानात्मक असूनही, रतन टाटा यांच्या नेतृत्वामुळे आणि धाडसी निर्णयांमुळे ब्रँड्सचं पुनरुज्जीवन झालं. 2009मध्ये कंपनीला 55 दशलक्ष पौंड्सचा निव्वळ नफा झाला. यावरून टाटांच्या धोरणात्मक हस्तक्षेपाचा परिणाम आणि प्रभाव दिसून येतो.