सीबीएसईने अधिकृत रित्या जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा 17 फेब्रुवारी 2026 ते 15 जुलै 2026 या काळात घेण्यात येणार आहेत. 2026 च्या या परीक्षेला अंदाजे 45 लाख विद्यार्थी बसतील. तसेच या परीक्षा 204 विषयांसाठी घेतल्या जाणार असून भारत आणि 26 देशातील विविध केंद्रांवर आयोजित केल्या जातील, असं सीबीएसईकडून स्पष्ट करण्यात आलंय.
advertisement
कुठं पाहता येईल वेळापत्रक?
सीबीएसईकडून बुधवारी, 24 सप्टेंबर रोजी 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षांसाठी तात्पुरती तारीख जाहीर करण्यात आली. यामध्ये सीबीएसई बोर्ड परीक्षा 2026 ला बसणारे हायस्कूल आणि इंटरमिजिएट विद्यार्थी cbse.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तेथिल लिंकवरून CBSE डेटशिट 2026 ची पीडीएफ डाऊनलोड करू शकतात.
दहावी, बारावी परीक्षा कधी?
सीबीएसईने जारी केलेल्या तात्पुरत्या वेळापत्रकानुसार दहावीच्या परीक्षा 17 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू होतील. या परीक्षा 6 मार्च 2026 ला संपतील. तर बारावीच्या परीक्षा 17 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू होतील आणि 9 एप्रिल 2026 ला संपतील.
परीक्षेची अंतिम वेळापत्रक कधी?
सीबीएसईने जारी केलेल्या परीक्षेच्या तारखा या तात्पुरत्या स्वरुपाच्या आहेत. लवकरच अंतिम तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. विद्यार्थी, पालकांना नियोजन करता यावे, शाळांना विविध कार्यक्रमांचे नियोजन करता यावे, यासाठी हे तात्पुरते वेळापत्रक जाहीर केले आहे. सीबीएसई बोर्ड परीक्षेचे निकाल वेळेवर जाहीर करता यावेत यासाठी बोर्डाकडून नियोजन केले जात असून त्यासाठी तात्पुरते वेळापत्रक जाहीर केले आहे.
परीक्षेची वेळ काय?
सीबीएसई बोर्डाची दहावी आणि बारावीची परीक्षा एकाच शिफ्टमध्ये सुरू होणार आहे. सकाळी 10.30 वाजता परीक्षा सुरू होईल. या वेळापत्रकात भाषा संबंधित प्रश्नपत्रिका, मुख्य विषय आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
दरम्यान, सीबीएसईने तात्पुरते वेळापत्रक जाहीर केल्याने शाळांसोबतच विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना देखील परीक्षा आणि इतर शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन करता येणार आहे. विद्यार्थ्यांची अंतिम यादी सादर झाल्यानंतर अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.