समस्तीपुर : आयुष्यात जे प्रामाणिकपणे प्रयत्न करतात, सातत्याने मेहनत करतात त्यांना यश नक्कीच मिळते, हे पुन्हा एका विद्यार्थ्याने सिद्ध करुन दाखवले आहे. 8 वर्षांचा असताना वडिलांच्या निधनानंतर आईने त्याचे पालनपोषण केले आणि आज या मुलाने आपल्या आई वडिलांचे नाव मोठे केले आहे.
प्रवीण असे या मुलाचे नाव आहे. बिहार बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत त्याने संपूर्ण राज्यात आठवा क्रमांक मिलवला आहे. प्रवीण हा बिहारच्या समस्तीपूर येथील रहिवासी आहे. त्याचे सुरुवातीचे शिक्षण हे गावातच झाले. दहावीचे शिक्षण त्याने हसनपूर येथील उच्च विद्यालय मालदह येथून पूर्ण करत 500 पैकी 481 गुण मिळवले. यानंतर त्याचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
advertisement
प्रवीणची आई अंगणवाडी सेविका आहे. त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्या आपले घर चालवतात. प्रवीण ने लोकल18 शी बोलताना सांगितले की, मी 8 वर्षांचा होतो त्यावेळी दीर्घ आजाराने माझ्या वडिलांचे निधन झाले. शिक्षणात जो काही खर्च होता तो माझ्या आईने केला. माझ्या वडिलांच्या निधनानंतर मी आयुष्यात काहीतरी करण्याचे ठरवले होते. तसेच दहावीच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचे माझे स्वप्न होते. त्यामुळे मी यासाठी 8 ते 9 तास दररोज अभ्यास केला. सध्या माझ्या कुटुंबात आजी आजोबा आई असून सर्वांनी मला पाठिंबा दिला.
एकाकडे तर दागिने अन् वाहनही नाही..., या TOP 5 IAS अधिकाऱ्यांची संपत्ती किती माहितीये का?
भविष्यात काय व्हायचंय -
प्रवीणच्या या यशानंतर आता त्याचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. भविष्यात त्याला डॉक्टर बनायचे आहे, असे त्याने सांगितले. त्याने आपल्या यशाचे श्रेय हे आई-वडिलांना दिले आहे.
कोणत्या विषयात किती गुण -
प्रवीणने सांगितले की, त्याला गणितात 100 पैकी 98 गुण, संस्कृतमध्ये 100 पैकी 94 गुण, विज्ञानात 100 पैकी 98 गुण, तसेच समाजशास्त्रात 100 पैकी 96 गुण आणि हिंदीमध्ये 100 पैकी 95 गुण मिळाले.
