मॅनपॉवर ग्रुपच्या सर्वेक्षणानुसार, 2024 च्या जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत रोजगाराच्या दृष्टिकोनातून भारत जागतिक स्तरावर सहाव्या क्रमांकावर आहे. देशातील 30 टक्के कंपन्या येत्या तीन महिन्यांत त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचा विचार करत आहेत. यानुसार पाहिलं तर सध्या देशात 16.6 लाख कंपन्या नोंदणीकृत आहेत आणि त्यातील 30 टक्के म्हणजे 4.98 लाख कंपन्या होय. याचा अर्थ या सर्व कंपन्या आता सक्रिय झाल्या तर आगामी काळात सुमारे पाच लाख कंपन्या नोकरभरती करू शकतात.
advertisement
सरासरी जागतिक स्तरापेक्षा जास्त भरती
अहवालानुसार, भारताच्या नेट रोजगार आउटलूकची (एनईओ) गणना करण्याची योजना असलेल्या कंपन्यांच्या संख्येतून कामगार कमी करण्याची योजना असलेल्या कंपन्यांची संख्या वजा करून काढण्यात आली आहे. 30 टक्के कंपन्या पुढील तीन महिन्यांत त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचा विचार करत असल्याचे यातून समोर आले. रोजगाराच्या दृष्टिकोनातून भारत जागतिक स्तरावर सहाव्या क्रमांकावर आहे. हे स्थान जागतिक सरासरीपेक्षा आठ गुणांनी जास्त आहे. हे सर्वेक्षण 42 देशांमध्ये करण्यात आले.
सर्वाधिक नोकर भरती कुठे होणार?
जागतिक स्तरावर कोस्टा रिका मध्ये जुलै-सप्टेंबरसाठी सर्वाधिक 35 टक्के नोकरभरती अपेक्षित आहे. यानंतर स्वित्झर्लंडमध्ये 34, ग्वाटेमालामध्ये 32, मेक्सिकोमध्ये 32 तर दक्षिण आफ्रिकेतील 31 टक्के कंपन्या पुढील तीन महिन्यांत नोकरभरती करण्याचा विचार करत आहेत. दुसरीकडे, अर्जेंटिना आणि रोमानियामध्ये सर्वांत कमी तीन टक्के एनईओ नोंदवला गेला.
भारतातील तीन हजार कंपन्यांचे सर्वेक्षण
मॅनपॉवर ग्रुपच्या एम्प्लॉयमेंट आउटलूक सर्वेक्षणाच्या नवीन आवृत्तीने देशातील 3150 कंपन्यांना त्यांच्या तिसऱ्या तिमाहीतील नोकरभरतीच्या नियोजनाबाबत विचारले. या विषयी मॅन पॉवर ग्रुपचे भारत आणि पश्चिम आशियाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप गुलाटी म्हणाले की, जागतिक मंदीचा भारतातील आयटी क्षेत्रावर दीर्घकाळ परिणाम होत आहे. या सर्वेक्षणातील डाटा संकलनावेळी सार्वत्रिक निवडणुकांमुळे देशात राजकीय अनिश्चिततेचे वातावरण होते आणि कंपन्या त्यांच्या अल्पकालीन पायाभूत सुविधांच्या नियोजनात सावधगिरी बाळगून होत्या.
सर्वाधिक शक्यता उत्तर भारतात
निवडणुकीच्या कालावधीत देखील रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणुकदारांचा कल वाढला आहे. निवासी क्षेत्रात 1.1 अब्ज डॉलर भांडवलाचा ओघ आला आहे. एकूणच उत्तर भारतात नोकरभरतीची शक्यता सर्वाधिक 36 टक्के होती. त्यानंतर पश्चिम भागात 32, दक्षिणेत 30 तर पूर्व भागात 21 टक्के कंपन्यांनी नोकरभरतीची इच्छा व्यक्त केली आहे. एका समजुतीच्या अगदी विरुद्ध, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय आणि मशीन लर्निंगचा अवलंब केल्यामुळे सुमारे 68 टक्के कंपन्या पुढील दोन वर्षांत कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची योजना आखत आहेत. याचे नेतृत्व दळणवळण सेवा क्षेत्र, आर्थिक आणि रिअल इस्टेट, उद्योग व साहित्य आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्र करेल.
