आपल्या देशामध्ये नोकरीच्या शोधात असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसं पाहिलं तर इंटरव्ह्यु ही नोकरी मिळवण्याच्या मार्गातील एक अतिशय महत्त्वाची पायरी असते. खासगी नोकऱ्यांबद्दल बोलायचं झालं तर बहुतांश तरुण इंटरव्ह्युमध्ये अशी चूक करतात, ज्यामुळे त्यांची नोकरीची संधी जाते. इंटरव्ह्युमधील छोट्याछोट्या गोष्टी इंटरव्ह्यु घेणाऱ्यांचं तुमच्याबाबतचं मत चुकीचं ठरवू शकतात. यासंदर्भात प्रसिद्ध हायरिंग एक्स्पर्टनं महत्त्वाची माहिती दिली आहे.
advertisement
हायरिंग प्लॅटफॉर्म ग्रोथ असिस्टंटचे सीईओ श्वागर यांनी एका बिझनेस चॅनेलला दिलेल्या इंटरव्ह्युमध्ये त्यांना नोकरीसाठी येणाऱ्या उमेदवारांचा इंटरव्ह्यु घेताना येणारा अनुभव शेअर केलाय. त्या म्हणाल्या, 'मी पूर्वी कॉलेजमधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यु घेत असे. पण नुकताच मी सीनिअर लेव्हलसाठी इंटरव्ह्यु घेतला. तेव्हा त्यांच्यात उणीव असल्याचं लक्षात आले. ज्या कारणामुळे त्यांना नाकारले गेले, ते पाहता इंटरव्ह्यु घेणारा स्वतःचा वेळ वाया जाऊ नये, असा विचार करीत असावा,' असेही त्या म्हणाल्या.
सोशल मीडिया प्रोफाइल महत्त्वाचे
जेव्हा एखादा उमेदवार इंटरव्ह्युसाठी येत असतो, तेव्हा तो त्याचे लिंक्डइन, एक्स प्रोफाईलबद्दल माहिती देत असतो. उमेदवाराचा सूर हा सकारात्मक आहे का, हे इंटरव्ह्यु घेणाऱ्याला या सोशल मीडिया प्रोफाइलवरून सहज समजते. त्यामुळे आजच्या काळात नोकरी मिळवण्यासाठी सोशल मीडियाचा देखील महत्त्वाचा वाटा आहे.
सकारात्मक सूर कसा येईल?
रिक्रूटमेंट एजन्सीच्या म्हणजेच एखाद्या थर्ड पार्टीच्या माध्यमातून नोकरी शोधणाऱ्यांना श्वागर यांनी मोलाचा संदेश दिलाय. त्या म्हणाल्या, 'थर्ड पार्टीच्या माध्यमातून इंटरव्ह्युसाठी येणाऱ्या व्यक्ती स्वतःच्या तयारीचे पुनरावलोकन करीत नाहीत. ज्या क्षेत्रात काम करायचे आहे, त्या क्षेत्रासंबंधित सक्रियपणे संशोधन करीत नाहीत. अशा वेळी इंटरव्ह्यु घेणारा स्वतःचा फारसा वेळ वाया न घालवता उमेदवाराला नाकारण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे नोकरीसाठी खऱ्या अर्थानं रस दाखवण्यासाठी संशोधन करणे महत्त्वाचे आहे.'
कोणतीही नोकरी मिळवण्यासाठी इंटरव्ह्यु खूपच महत्त्वाचा असतो. त्यामुळे इंटरव्ह्युची तयारी योग्य करणे गरजेचे आहे.
